▪️ पतीच्या अंत्यसंस्कारापासून सहचारिणी दूर..
लॉकडाऊनचा दुर्दैवी परिणाम
निफन्द्रा/रवींद्र कुडकावार
लॉकडाऊन मुळे पतीचे अंत्यसंस्कारासाठी जीवनसाथी अर्धांगिनी पोहचू न शकल्याची दुखद घटना सावली तालुक्यातील खेडी येथे घडली.
पती पत्नीचे नाते हे जन्मोजन्माचे समजले जाते. पती असो की पत्नी कितीही दूर असले तरी शेवटच्या क्षणी मात्र वाट पाहिल्याशिवाय अंत्यसंस्कार होत नाही. मात्र सद्या भारत देशात कोरोनाच्या प्रभावामुळे संचार बंदी व लॉकडाऊन चा फटका अनेकाना बसत आहे . त्यामुळे
मजूर असलेली पत्नी पतीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकली नाही.
मूळचे मूल तालुक्यातील बोरचांदली येथील रुपेश रामटेके यांचा विवाह 12 वर्षांपूर्वी खेडी येथील कविता भडके हिचेशी झाला. परंतु पतीचे आरोग्य साथ देत नसल्याने पती नेहमी आजारी असायचा. त्यामुळे संसाराचा गाडा चालविण्याचा भार कविता हिच्यावर होता. मोल मजुरी करून आपल्या 10 वर्षाच्या मुलासह कधी बोरचांदली तर कधी खेडी येथे मजुरी करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होती. मिरची तोडण्याचे कामाकरिता तेलंगणा राज्यात आपल्या पतीला व मुलाला खेडी येथे ठेऊन ही माऊली गेली. जगात कोरोनाचे संकट आले. देशात, राज्यात संचारबंदी लागू झाली. त्यामुळे या कुटुंबालाही पटका बसला त्यातच पती रुपेश याची तब्येत अधिकच खालावली. त्यामुळे पत्नीच्या नातेवाईकांनी सावली ग्रामीण रुग्णालयात भरती केले. मात्र तब्येत खालावत असल्याने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी भरती केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तिकडे पत्नीला कळवले मात्र लॉकडाऊनमुले येणे शक्य नव्हते. अश्रूशिवाय काहीच तिच्याकडे पर्याय नव्हता. नातेवाईकांना जीवनसाथी अर्धांगिनी शिवाय अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली.