राष्ट्रसंतांचे आदर्श व देशभक्तीचे संस्कार यातूनच देतोय सेवा..
राजुरा- जिल्हा .चंद्रपूर
( आनंद चलाख)..
सेवानिवृत्तीनंतर बऱ्याचदा प्रत्येक व्यक्ती वेगळ्या विश्वामध्ये जगत असतो. मात्र महसूल विभागातील सेवानिवृत्त शिपाई साठीच्या उंबरठ्यावरी न थकता अविरतपणे देशासाठी राजुरा शहरात कोरोणाविरुद्ध जनजागृती करतोय. या वयात विश्रांतीची गरज असताना उन्हातानात दररोज आठ तास लढतोय. सकाळी दहा वाजता हातात माईक आणि एका हातात दंडा घेऊन शहरातील गर्दीच्या ठिकाणे पिंजून काढतो आणि भोंग्या वरून इशारा देऊन सोशल डिस्टन्स व प्रशासनाच्या नियमांचे पालन करायला सांगतो. वयाच्या साठाव्या वर्षी न थकता देशासाठी तरुणा सारखा लढणारा हा योद्धा म्हणजे सेवानिवृत्त शिपाई क्रांतिभूमीचा सुपुत्र रमेश नारायणराव चन्ने .
रमेश नारायणराव चन्ने वय 60 वर्ष. मूळ गावं चिमूर. जिल्हा चंद्रपूर. सेवानिवृत्तीनंतर सध्या राजुरा येथे वास्तव्यास आहे. राजुरा तहसील कार्यालयात शिपाई पदावरून ऑक्टोबर 2018 मध्ये सेवानिवृत्त झाले.
मात्र सेवानिवृत्तीनंतरही रमेश चन्ने थकलेले नाहीत. यांच्या नसानसात ठासून देशप्रेम भरलेला आहे. कोरोणा महामारी संकटाच्या काळात शहरातील नागरिकांना जागृत करण्यासाठी योद्ध्यासारखे लढतोय. सकाळी दहा वाजल्यापासून घराच्या बाहेर पडतो आणि शहरातील बँका, भाजीपाला मार्केट ,दुकाने या ठिकाणी जाऊन भोंगा वाजवून लोकांना सूचना करतोय. कोरोणाचे भयानक परिणाम लोकांना सांगतोय. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी प्रशासनाचे सूचनांचे पालन करायला लोकांना जागृत करतोय. शिपाई पदावरून निवृत्त झाल्यानंतरही सामाजिक जाणिवेतून चन्ने देशासाठी लढतोय.
सेवेत शिपाई पदावर असतानाही अनेक चांगले कार्य त्यांनी केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.याला पार्श्वभूमीही राष्ट्रसंतांचा आदर्शाची आहे. रमेश चन्ने यांचे बालपण व शिक्षण क्रांतीभूमि चिमूर येथेच झाले. शिकत असताना शालेय जीवनात स्काऊट गाईडच्या माध्यमातून शिस्तीचे व देशभक्तीचे धडे मिळाले. स्वातंत्र्यलढ्याच्या क्रांती संग्रामात आजोबा व वडील यांचेही मोठे योगदान असल्याचे अभिमानाने सांगतो. राष्ट्रसंताच्या सहवासात बालपणापासून आल्याने त्यांच्या कार्याचा विचारांचा प्रभाव रमेश चन्ने यांच्यावर आहे. चिमूरच्या क्रांती लढ्यातील धगधगत्या आठवणी अजूनही सांगताना चन्ने यांचा ऊर भरून येतो. अत्याचार व अन्यायाविरुद्ध रक्त सळसळतो. बालपणापासूनच घरचे संस्कार व राष्ट्रसंतांच्या विचाराने देश प्रेमाचा प्रभाव माझ्यावर आहे. त्यामुळे सेवेत असतानाही व सेवेनंतर राहील जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा देशासाठी मी माझे आयुष्य समर्पण करेल असे अभिमानाने सांगतो.
आज संपूर्ण जगात कोरोना महामारी चे संकट उभे आहे. संपूर्ण देश तीन मेपर्यंत लाकडावून आहे. नागरिकांना या रोगा विरुद्ध लढण्यासाठी घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन अहोरात्र झटत आहे. या रोगाविरुद्ध लढण्यासाठी सर्वांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. विनाकारण रस्त्यावर फिरून व गर्दी वाढवून नियमांचे उल्लंघन करू नये.आपले कुटुंब ,आपले जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने घरी सुरक्षित रहावे. यासाठी लोकांना मी पटवून देत आहे, असे रमेश चन्ने यांनी सकाळ'शी बोलताना प्रतिक्रिया दिली.