एकूण ६,५९,२५० रुपये लाभार्थ्यांच्या थेट बॅंक खात्यात
चंद्रपुर :
शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता देशपातळीवर साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केलेला आहे. सदर प्रतिबंधात्मक कायद्यान्वये नागरिकांना विशेषतः दिव्यांग नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याकरीता त्रास सहन करावा लागू नये म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील दिव्यांगांना धान्य किट खरेदी करण्याकरिता आर्थिक सहाय्य करण्यात आलेले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या एकूण ८७९ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी ७५० रुपये मनपातर्फे सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. यातील सौ. रेखा विठ्ठल चौधरी या दिव्यांग लाभार्थींना ७५० रुपयांचा धनादेश आज महापौर सौ. राखी कंचर्लावार यांच्या हस्ते महापौर कक्षात देण्यात आला.
मनपातर्फे नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत अर्ज सादर केलेल्या एकुण ८७९ दिव्यांग नागरिकांना अन्नधान्याची किट खरेदी करण्याकरिता सानुग्रह निधीच्या स्वरूपात ७५० रुपये प्रति लाभार्थी असे ६,५९,२५० रुपये लाभार्त्यांच्या थेट बॅंक खात्यात आरटीजीएस द्वारे जमा करण्यात आलेले आहे.
या अगोदर शासन निर्णयानुसार मनपा क्षेत्रातील दिव्यांग नागरिकांकरीता मनपाद्वारे ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आलेला होता. त्यानुसार आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात दिव्यांगांकरीता निधीची तरतूद करण्यात आली होती. त्याअन्वये सन २०१८ ते २०१९ या कालावधीत अंदाजे ७५० दिव्यांग लाभार्थ्यांना सक्षम करण्याकरीता व स्वयंरोजगाराकरीता अपंगांच्या टक्केवारीनुसार अर्थसहाय्य करण्यात आलेले होते.
याप्रसंगी उपमहापौर व स्थायी समिती सभापती श्री. राहुल पावडे, महिला व बालकल्याण सभापती सौ. शीतल गुरनुले, उपसभापती सौ. चंद्रकला सोयाम, झोन क्र. १ सभापती प्रशांत चौधरी, झोन क्र. २ सभापती सौ. कल्पना बगुलकर, नगरसेवक रवी आसवानी, उपायुक्त श्री. गजानन बोकडे, समाज कल्याण अधिकारी श्री. सचिन माकोडे उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये दिव्यांग व्यक्तींना जीवनाच्या सर्वांगीण समान संधी उपलब्ध व्हाव्या, त्यांच्या हक्काचे पुर्ण संरक्षण व्हावे व दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तू घेण्यास अडचण होऊ नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शासन धोरणाप्रमाणे आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे - महापौर सौ. राखी कंचर्लावार.