नागपूर/प्रतिनिधी:
भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अमूल्य योगदान देणारे कपूर घराण्यातील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे अचानक जाणे हे त्यांचे चाहते व चित्रपटसृष्टीसाठी धक्कादायक आहे. ऋषी कपूर यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीतील कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशी शोकसंवेदना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.
इरफान खान यांच्या निधनानंतर दुःख सावरायला वेळ मिळण्याच्या अगोदरच ऋषी कपूरचे आज निधन झाल्यामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. हरहुन्नरी कलाकार ऋषी कपूर यांची प्रत्येक पिढीला आठवण असणार आहे, अशी भावना डॉ. राऊत यांनी व्यक्त केली आहे.
कँसरसोबत त्यांची झुंज अपयशी ठरली तरी नुकतेच त्यांनी "कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकायचे आहे" असे ट्विट केले होते. आपले आरोग्य धोक्यात घालून जनतेची सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, आरोग्य सेवक व पोलीसांना त्यांनी अभिवादन केले आहे.
संपूर्ण देशाला या महान कलाकाराने कोरोनाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली असून ते आमच्या सदैव स्मरणात राहतील. कपूर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याच्या भावना डॉ. राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत.