नागपूर : अरुण कराळे :
कोरोनाची दहशत व लॉकडाऊनमुळे नागरिक घरात बंद आहेत. अत्यावश्यक सेवा व व्यवसाय वगळता इतर सेवा-सुविधा बंद आहे. खास करून शौकिनांची दारूविक्री बंद असल्याने त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी परिसरात काही अवैध दारू विक्रेत्यांचा छुप्या पद्धतीने धंदा सुरू आहे. यामध्ये टेकडी वाडी परिसरात एक दारू विक्रेता मोहफुलाची दारू आणून नियमबाह्य पद्धतीने व चढय़ा भावाने विकत असल्याची गुप्त माहिती वाडी पोलिसांना कळताच टेकडी वाडी येथील आरोपी इसमाच्या घरी छापा टाकून १५ लिटर मोहफुलाची दारू जप्त केल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
लॉकडाऊन काळात १४४ धारा लागू असून, नागरिकांचा विरोध असतानाही आरोपी सर्रासपणे मोहफुलाची अवैधपणे दारू विकत होता. याबाबत नागरिकांनी आरोपीला हटकले असता तो अरेरावीची भाषा वापरत होता. यामुळे येथील रहिवासी भीतीच्या छायेखाली होते. या बाबीची सूचना येथील नागरिकांनी वाडी पोलिसांना देऊन कारवाईची मागणी केली.
वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेकडी वाडी येथील मुख्य मार्गावर असलेल्या निखिल किराणा स्टोअर्सच्या बाजूला आरोपी राजू मोहन खंडारे (३४), रा. टेकडी वाडी हा अवैधपणे मोहफुलाची दारू विकत असल्याचे स्पष्ट होताच वाडी पोलिसांनी आरोपी राजूच्या घरी आकस्मिक छापा टाकून १५ लिटर दारू जप्त केली.
आरोपी राजू मोहन खंडारे याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत कलम ६५ (इ) अन्यवे कारवाई करून अटक करण्यात आली.वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पो. काँ. गोपीचंद जाधव, सुरेश शेंद्रे आदींनी कारवाई करून त्याला मुद्देमालासह अटक करून त्याच्यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.