कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसोलेशन हॉस्पिटलचा होतोय कायापालट
भेट देऊन केली पाहणी
नागपूर/प्रतिनिधी:
कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी नागपूर महानगरपालिकेने कंबर कसली असून कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्यास तत्पर आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू असून मनपाच्या पाच रुग्णालयांचा कायापालट करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील १० दिवसात सुमारे ३०० ते ४०० खाटांची ऑक्सीजनसह व्यवस्था उभी करण्यात येईल, अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.
नागपूर शहरातील मनपाद्वारे संचालित पाच रुग्णालयांचा कायपालट करण्याचे कार्य सुरू झाले आहे. यामध्ये पाचपावली सुतिकागृह, पाचपावली हॉस्पिटल, सदर हॉस्पिटल, के. टी. नगर येथील एस.आर.ए. इमारत आणि आयसोलेशन हॉस्पिटलचा समावेश आहे. महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी (ता. २७) आयसोलेशन हॉस्पिटलला भेट देऊन सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. अत्याधुनिक सोयींनी युक्त आणि सुसज्ज हॉस्पिटल पुढील काही दिवसात तयार होणार आहे. कोरोना विषाणू प्रसारासंदर्भातील नागपूरची स्थिती बघता भविष्यात येणाऱ्या संकटाचा विचार करून ह्या सोयी करणे क्रमप्राप्त आहे.
म्हणूनच नागपूर महानगरपालिकेने हे पाऊल उचलले असून कोव्हिड -१९ च्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सोयी येथे करण्यात येत आहे. महापौर या नात्याने आपण या सर्व व्यवस्थेवर जातीने लक्ष ठेवून आहोत. नागपूरकरांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सोयीसंदर्भात मनपा दक्ष असून नागपूरकरांना संपूर्ण उपचार येथेच उपलब्ध होईल, अशी व्यवस्था आम्ही करीत आहोत. यापेक्षा अजून काय चांगले करता येईल, यावरही आम्ही विचार करीत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाची साखळी इथेच तुटावी, असे तुम्हा-आम्हा सर्वांना वाटते. त्यासाठी नागपूरकरांचे संपूर्ण सहकार्य लॉकडाऊनदरम्यान अपेक्षित आणि आवश्यक आहे. बुहान ते सतरंजीपुरा हे अंतर साडेसहा हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे. मात्र, सतरंजीपुरा आपल्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांनी आता निर्णय घ्यायला हवा. घरात राहून कोरोनाची साखळी तोडा, असे आवाहनही महापौर संदीप जोशी यांनी यावेळी केले.