मुंबई -
लॉकडाऊन व त्यानंतरच्या सणासुदीच्या काळात वीज पुरवठा खंडित होणार नाही याची फ्रेंचाईझी कंपन्यांनी खबरदारी घ्यावी असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. आज नागपूर येथील प्रादेशिक संचालक महावितरण कार्यालयात भिवंडी, मुंब्रा- कळवा व मालेगाव येथील तीन खाजगी वीज वितरण फ्रेंचाईझी सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
या व्हिडिओ कॉन्फरन्सने आयोजित आढावा बैठकीत स्वतः ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, प्रधान सचिव, ऊर्जा तसेच अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक महावितरण असिम गुप्ता, टोरंट कंपनीचे जिनल मेहता व जगदीश आणि सी.ई.एस.ई. कंपनीचे गौतम रॉय, देवाशीष बॅनर्जीव बिपलँब पॉल हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कोविड 19 चा प्रादुर्भाव, लॉकडाऊन आणि उद्योगधंदे बंद झाल्याने त्याचा विपरीत परिणाम सर्वत्रच दिसून येत आहे. 20 एप्रिलपासून राज्यातील काही भागांत उद्योगधंदे सुरू होत आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत वाढ होणार आहे. सोबत रमजान, उन्हाळा आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर फ्रेंचाईझी कंपन्यांची पूर्वतयारी, नियोजन आणि कृती आराखडा तयार करावा. त्यासाठी फ्रँचाईझी कंपनीने तयार राहावे असे निर्देश राऊत यांनी दिले आहेत.
या काळात जर आपण अखंडीत वीजपुरवठा दिला तर राज्यातील जनतेत निश्चितच महावितरणची प्रतिमा अधिक उजळ होण्यास हातभार लागेल असे डॉ. नितीन राऊत म्हणाले.
आज राऊत यांनी फ्रेंचाईझी कंपनींचा तपशीलवार आढावा घेतला. लॉकडाऊन कालावधीत भारनियमन, ब्रेक डाऊन होणार नाही याची खबरदारी घेण्याचे महावितरण व फ्रेंचाईझी कंपन्यांना निर्देश दिले आहेत.
याप्रसंगी फ्रेंचाईझी कंपन्यांनी लॉकडाऊनमुळे वीज बिल वसूलीवर मोठा आर्थिक परिणाम झाल्याचे सांगितले. यामुळे महावितरणने आर्थिक सवलत देण्यास सकारात्मक विचार करावा अशी विनंती फ्रेंचाईझी कंपन्यांनी केली.
राज्यभरात वीज वितरण हानी कमी करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपले कौशल्य पणास लावावे असे राऊत यांनी यावेळी सांगितले.