नागपूर:
कोरोनाच्या महासंकटात नागपूरकरांसाठी आज दोन आशादायी बातम्या आहेत. पहिली म्हणजे नागपूर शहरातील एक कोरोनाबाधीत रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला तर आजच्या दिवशी एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही.
आज कोरोनामुक्त होऊन घरी परतलेला रुग्ण एम्प्रेस सिटी येथील रहिवासी आहे. हा व्यक्ती दिल्ली येथे गेला होता. वृंदावन येथून तेलंगाणा एक्स्प्रेसने १७ रोजी नागपूरकरिता निघाला. १८ मार्च रोजी तो नागपुरात पोहोचला. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी रुग्णालय गाठले. २८ मार्च रोजी त्यांच्या स्वॅबचा पहिला चाचणी अहवाल आला. त्यात तो रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच दिवशी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.
१४ व्या दिवशी म्हणजे १० एप्रिल रोजी त्यांची दुसरी चाचणी करण्यात आली. तिसरी चाचणी १८ एप्रिल रोजी करण्यात आली. या दोन्ही चाचण्या पॉझिटिव्ह होत्या. त्यांच्यावर नियमित उपचार सुरू होते. २१ आणि २२ एप्रिल रोजी पुन्हा त्यांचे स्वॅब घेण्यात आले. ह्या दोन्ही चाचण्या मात्र निगेटिव्ह आल्या. चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना गुरुवारी (ता. २३) कोरोनामुक्त म्हणून घरी पाठविण्यात आले.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांच्या मार्गदर्शनात कोव्हिड-१९ वॉर्डाचे प्रमुख डॉ. राखी जोशी, मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. पराते, डॉ. रवी चव्हाण यांनी त्यांच्यावर उपचार केलेत.
खामला येथील कोरोनाबाधीत रुग्ण ज्या ट्रेनने प्रवास करीत होता त्याच ट्रेनमध्ये हा व्यक्ती होता मात्र अन्य डब्यात होता.आज हा रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या चमूने निरोप दिला आणि टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.