प्रशासनाचे मानले आभार
निफन्द्रा( प्रतिनिधी)
तिकडे मजुरीसाठी तेलंगणा राज्यात गेलेली आई व इकडे वडिलाच्या मृत्यूमुळे पोरका झालेला बाळ अशा अडचणीत सापडलेल्या आई - मुलाची भेट अखेर 25 दिवसांनी प्रशासनाने घडवून आणली.
सावली तालुक्यातील खेडी येथे आपल्या माहेरी आजारी पती व मुलाला ठेऊन मिरची तोडण्याचे कामाकरिता कविता रामटेके ही माऊली तेलंगणा राज्यात गेली. जगात कोरोनाचे संकट आले देशात, राज्यात संचारबंदी लागू झाली त्यामुळे या कुटुंबालाही पटका बसला. त्यातच पती रुपेश रामटेके याची तब्येत बिघडली. पत्नीच्या नातेवाईकांनी सावली ग्रामीण रुग्णालयात भरती केले मात्र तब्येत खालावत असल्याने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. मात्र उपचारादरम्यान 1 एप्रिल रोजी रुपेशचा मृत्यू झाला. तिकडे पत्नीला कळवले मात्र लॉकडाऊनमुळे येणे शक्य नव्हते अश्रूशिवाय काहीच तिच्याकडे पर्याय नव्हता. नातेवाईकांनी मुलाला घेऊन जीवनसाथीशिवाय अंत्यसंस्कार पार पाडले. मात्र आई नाही व वडील नाही या विवनचनेत 10 वर्षाचा संकेत दुःखी होता. ही बाब पंचायत समिती सभापती विजय कोरेवार व समाज माध्यमांनी लावून धरली. त्यामूळे जिल्हा प्रशासनाने त्या महिलेला आणण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्हा प्रशासनाची तयारी चार दिवसापूर्वी झाली व त्यांनी महाराष्ट्र पोलीस संचालक यांचेकडे परवानगी मागितली. ही परवानगी मिळताच तेलंगाना राज्यात गाडी पाठवून त्या महिलेला घरी पोहचविले व मुलांची भेट घडवून आणली. सदर महिला घरी आल्यानंतर पोलीस व आरोग्य विभागाच्या चमूने भेट दिली. कोरोनाचा संसर्ग नियमानुसार डॉक्टरांनी तपासणी केली व तिला होम कोरेन्टाईन करण्यात आले आहे.