Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल २९, २०२०

पाच वर्षाचा बालक पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील रुग्ण संख्या 14 वर

मुलाच्या आई-वडिलांचा कोरोना अहवाल मात्र निगेटिव्ह
सदर कुटुंब औरंगाबादहून गावात आले होते




हिंगोली/ प्रतिनिधी - सेनगाव तालुक्यातील क्वारंटाइन सेंटर मधील 5 वर्षाचा बालक पॉझिटिव आला असून त्याबाबतचा अहवाल मंगळवारी (27 एप्रिल) सकाळी शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे.

जिल्हाभरात मोठ्या शहरातून येणाऱ्या गावकऱ्यांची गावपातळीवर माहिती घेऊन त्यांना तातडीने क्वारंटाइन केले जात आहेत. त्यानुसार सेनगाव तालुक्यामध्ये बाहेर जिल्ह्यातून आलेल्या 61 गावकऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी 51 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित दहा जणांचा अहवाल येणे बाकी होते. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये पाच वर्षांचा बालक कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यात पॉझिटिव रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे.


दरम्यान सदर मुलाचे आई-वडील औरंगाबाद येथे कामासाठी गेले होते. लॉकडाउननंतर ते सर्वजण सेनगाव तालुक्यातील जांभरून रोडगे गावात आले. सदर कुटुंब औरंगाबाद येथून आल्याची नोंद झाल्यानंतर त्यांना तातडीने सेनगावच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रुणवाल यांच्या पथकाने या गावकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले होते. या गावकऱ्यांपैकी 51 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र आज सकाळी एका पाच वर्षीय बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यानंतर आरोग्य विभागामध्ये धावपळ सुरु झाली.

गाव सील करण्याची प्रक्रिया सुरू
यासंदर्भात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार जीवन कुमार कांबळे यांनी तातडीने सर्व माहिती घेऊन जांभरून रोडगे गावांमध्ये तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय गाव सील करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील दोन दिवस जांभरून रोडगे या गावामध्ये सर्वेक्षणाचे काम केले जाणार असून सर्दी ताप खोकला असलेल्या रुग्णांची माहिती घेतली जाणार आहे. यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सतीश रुणवाल यांनी सांगितले की सदरील बालक जाभरून रोडगे येथील असून त्याचे कुटुंबीय 20 एप्रिल रोजी गावात आले होते. त्यानंतर तातडीने त्यांना सेनगावच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या आई-वडिलांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.


गावकर्‍यांनी घाबरून जाऊ नये : रूचेश जयवंशी जिल्हाधिकारी

सेनगाव तालुक्यातील पाच वर्षांचा बालक आल्यानंतर त्या गावांमध्ये खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतले जात आहेत त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. गावकऱ्यांनी सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य माहिती द्यावी. तसेच प्रशासनाला सहकार्य करावे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.