चंद्रपुर /प्रतिनिधी:
कोरोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास सरकारने बंदी घातली आहे. सरकारच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त राजेश मोहीते यांनी यासंबंधीचे निर्देश दिले असून, त्यानुसार चंद्रपुर शहरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणार्यांकडून २०० रुपये दंड आकारण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. महापालिकेच्या पथकांनी शहरात मास्कशिवाय फिरणार्या १२४ नागरिकांवर कारवाई केली असून प्रत्येकी २०० रूपयांप्रमाणे २४८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरीकांना घरातच राहण्याचे वारंवार आवाहन करत आहे. चंद्रपुर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही नागरिक विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने कोरोनाच्या फैलावाची शक्यता आहे. अशा नागरिकांवर पोलिस कारवाईही केली जात आहे. मात्र, तरीही घराबाहेर पडण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने पूर्वपरवानगी घेऊन घराबाहेर पडणार्यांनाही मास्क लावणे सक्तीचे केले आहे. त्यानुसार आता चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरात मास्कशिवाय फिरणार्यांना २०० रूपये दंड लावण्याची कारवाई सुरु केलेली आहे.
याची अंमलबजावणी २२ तारखेपासून सुरू करण्यात आली. प्रत्येकी २०० रूपयांप्रमाणे २२ एप्रिल रोजी ४२ नागरीकांवर कारवाई करून ८४०० दंड व २३ एप्रिल रोजी ८२ नागरीकांवर कारवाई करून १६४०० रूपयांचा दंड असे दोन दिवसात एकूण १२४ लोकांवर कारवाई करण्यात आली असून २४८०० रुपयांचा एकूण दंड पथकांनी वसूल केला आहे. झोननिहाय कारवाईदरम्यान झोन क्र.१ अंतर्गत ४१ लोकांवर कारवाई करून ८२०० रुपये दंड, झोन क्र. २ अंतर्गत ४२ लोकांवर कारवाई करून ८४०० रुपये दंड, झोन क्र. ३ अंतर्गत ४१ लोकांवर कारवाई करून ८२०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय मास्क न घातलेल्या व्यावसायिकांवरही कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान मास्क लावण्याची समज देण्यात येऊन प्रत्येक नागरीकाला ३ मास्कसुद्धा देण्यात आले.
प्रभागनिहाय तीन पथके
सहायक आयुक्त सचिन पाटील, शितल वाकडे, धनंजय सरनाईक यांच्या
नेतृत्वात तीनही झोनच्या स्वच्छता निरीक्षकांद्वारेही कारवाई करण्यात आली. या
कारवाईसाठी प्रत्येक प्रभागात पथक तैनात केली आहेत.दंड करण्याची कारवाई सातत्याने
सुरु राहणार असून आपल्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी मास्क लावुन ठेवण्याचे आवाहन
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.