येवला प्रतिनिधि/ विजय खैरनार
येवला: तालुक्यातील सायगाव (महादेववाडी) शाळा म्हणजे उपक्रमांचे भांडार. स्वच्छ शाळा सुंदर शाळेचं उत्तम उदाहरण म्हणजे महादेववाडी शाळा. भौतिक सुविधा, स्वयं शिस्त म्हणजे महादेववाडी शाळा. शालेय उपक्रमाबरोबर सहशालेय उपक्रमातुन विद्यार्थी दोषमुक्त घडत असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना दोषमुक्त अध्ययन अनुभव व विषमुक्त आहार गरजेचा आहे. हे महादेववाडीचे उपक्रमशील शिक्षक देविदास जानराव सर व अमर गावित सर यांनी दाखवून दिले. शाळेला तशी पाण्याची उत्तमच सोय देविदास जानराव सरांनी अतिशय मेहनतीतून उपलब्ध करून घेतली आहे. तसेच शाळेला उत्तम भौतिक सुविधा मिळवून दिल्या, काही स्वतः निर्माण केल्या. त्यातीलच एक उत्तम पाणी व्यवस्थापन सुविधा. यावर्षी पाऊस भरपूर असल्यामुळे शाळेत एक नवीन उपक्रम राबवायचा ठरला तो म्हणजे शेंद्रीय भाजीपाला पिकवण्याचा व तो विद्यार्थ्यांना खाऊ घालायचा. पाणी भरपूर परंतु खडकाळ जमीन. मग व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पालक यांच्या सहकार्याने शाळेत नदीचा पोयटा आणला व सपाटीकरण करून त्यावर गादी वाफे बनवले. याच गादी वाफ्यांमध्ये पालक, मेथी, कोथिंबीर, कांदे, वाल, भोपळे, गिलके, मुळा असे भाजीपाल्याचे विविध वाण लावण्यात आले. आधुनिक सिंचन व्यवस्था म्हणजे तुषार सिंचन पद्धतीने पाणी देण्यात आले. त्यातील टन काढणी देखील विद्यार्थी व शिक्षक हेच करत असतात. बघता बघता भाजीपाला अतिशय बहारदार आला. त्याला ना कुठले रासायनिक खत वापरले ना रासायनिक कीटकनाशक. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला हाच भाजीपाला विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ घातला जातो. कधी पालक भजी तर कधी पालक भाजी व बाजरीच्या भाकरी, कधी दाळबट्टी व पालक भाजी तर कधी कांदा पात भाजी, कधी भात भाजी तर कधी गिलके, भोपळे मेथी भाजी. शालेय पोषण आहाराबरोबर विद्यार्थी सेवन करत असलेला विषमुक्त भाजीपाला खाऊ घालतांनाचे समाधान काही वेगळे असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक देविदास जानराव सर, अमर गावित सर, अध्यक्ष गणपत इप्पर, उपाध्यक्ष संदीप माळी, जावेद शेख, महेंद्र आव्हाड, मदतनीस रेखा जानराव यांनी सांगितले. हा उत्कृष्ठ आहार बनवण्यासाठी लागणारा खर्च हा शिक्षक व अध्यक्ष, उपाध्यक्ष व पालक करत असतात.
या उपक्रमातून श्रमप्रतिष्ठा, नीटनेटकेपणा, सामाजिक एकोपा, स्त्री-पुरुष समानता, संवेदनशीलता अशा विविध मूल्यांची रुजवणूक या उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे. शाळकरी वयातच मूल्यांची रुजवणूक झाल्यास निकोप व निरोगी समाज व्यवस्था निर्माण होऊ शकते हा देखील एक हेतू साध्य होऊ शकतो. असा दुहेरी फायदा या उपक्रमातून साध्य झाला आणि होत असल्याचे देविदास जानराव सर यांनी आपले मत व्यक्त केले.