राजुरा, ता.13 मार्च : महाराष्ट्र सरकारच्या आवाहनानंतर कोरोना विषाणू संसर्गाचा प्रभाव लक्षात घेता जिवती तालुक्यातील रायपूर (खडकी) येथे आयोजित करण्यात आलेली तिसरी कोलाम परिषद तातडीने स्थगीत करण्यात आली आहे. या परिषदेची नविन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे आयोजन समितीने कळविले आहे.
येत्या 15 मार्चला या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. माणिकगड पहाडावर वास्तव्य करून राहणा-या आदिम कोलामांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न म्हणून कोलाम विकास फाऊंडेशन या संस्थेने हा उपक्रम सुरु केलेला आहे. या सोहळ्यात परीसरातील हजारो कोलाम एकत्र येऊन आपल्या समस्या मांडतात. कोलामी संस्क्रुतीचे प्रदर्शनही यावेळी घडविले जाते.
या परिषदेचे उद्घाटन नागपूर विभागिय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त मा. रमेश आडे यांचे हस्ते आयोजित करण्यात आले होते. परिषदेचे अध्यक्ष मा. ई. झेड. खोब्रागडे, मा. चंदू पाटील मारकवार, अँड. वामनराव चटप यांचे सुचनेवरून व समाज माध्यमांवर अनेकांनी व्यक्त केलेल्या भावनांचा आदर करीत कोलाम विकास फाऊंडेशन ने हा कार्यक्रम तुर्तास स्थगित करून, लवकरच कार्यक्रमाची पुढली तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे आयोजन समितीच्या वतीने सचिव मारोती सिडाम यांनी कळविले आहे.