चंद्रपूर/प्रतिनिधी:
मुख शुद्धीचा प्रकार म्हणून ओळखला जाणारा खर्रा विक्रीवर चंद्रपुरात बंदी घालण्यात आली आहे.
खर्रा शौकीन खर्रा खाऊन लोक कुठेही थुंकतात म्हणून सर्व प्रकारच्या पुड्या व पान विक्रीवर बंदी आहे. त्यामुळे शहरातील पानटपऱ्या बंद करण्याचे आदेश दिले आहे. छोट्या धंदेवाल्यांवर करोनाचे संकट कोसळले असून बंदीमुळे पान शौकिनांचा हिरमोड झाला आहे.
शासनाने करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार १३ मार्च २०२०पासून लागू करण्याबाबत आदेश काढले आहे. महाराष्ट्र राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू, खर्रा यांचे उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्रीवर एका वर्षाकरिता प्रतिबंध लावले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पानठेला, खर्रा विक्री केंद्र बंद ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नि. वि. मोहिते यांनी सांगितले.