महावितरणला ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले निर्देश
मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाने खाजगी क्षेत्रातील कंपन्या व व्यावसायिक आस्थापनांवर काम करणाऱ्यांना घरूनच ऑनलाइन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश ऊर्जामंत्री, डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.
राज्यात पुणे व मुंबई येथे लाखोंच्या संख्येने माहिती व तंत्रज्ञान, शासकीय व खाजगी कार्यालये, शिक्षण व संशोधन संस्था व इतर व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना आपल्या राहत्या घरापासून दूर असलेल्या कार्यालयात काम करण्यासाठी दूरचा प्रवास करावा लागतो. प्रवासासाठी बस व रेल्वे यासारख्या सार्वजनिक वाहतूकीचा उपयोग करून प्रवास करावा लागत असल्याने त्यांना कोरोना विषाणूची लागण लागण्याची शक्यता असल्याने खबरदारीच्या दृष्टीने व्यवस्थापनाने त्यांना 'वर्क फ्रॉम होम" च्या सूचना दिल्या आहेत.
त्यांच्या कामात व्यत्यय येऊ नये यासाठी येत्या 31 मार्च पर्यंत नियोजित देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे देखभाल व दुरुस्तीची कामे एप्रिल महिन्यात करणे शक्य असल्यास करावीत. जर काही अपरिहार्य कारणामुळेच देखभाल व दुरुस्तीची कामे करावी लागत असल्यास कमीत कमी वेळात पूर्ण करावीत असे निर्देश डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.