📌शापोआ आयुक्तांच्या निर्णयाला विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध
📌विद्यार्थी व शिक्षकांची सुरक्षा महत्त्वाची
📌शापोआ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात द्या
नागपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत पडून असलेल्या पोषण आहारासाठी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शाळेत बोलवणे चुकीचे आहे. शासनाच्या लाॅक डाऊन निर्णयाला शापोआ आयुक्तांकडून धाब्यावर बसविण्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा संबंधित जिल्हाधिकारी यांनी १६ मार्च पासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यात व देशात कोरोनाच्या थैमानाला रोखण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत लाॅक डाऊन करण्यात आले आहे. सर्वांना सक्तीने घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानंतर सुध्दा शिक्षण विभागाच्या शालेय पोषण आहार आयुक्तांनी शालेय पोषण आहार वितरणासाठी जावईशोध लावला आहे. संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेत जावून विद्यार्थ्यांना बोलावून पोषण आहार वाटप करण्याचे पत्र २७ मार्च रोजी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविले. याच पत्राच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी २८ मार्च रोजी पत्र पाठवून कार्यवाही करण्याचे फर्मान काढले आहे. विशेष म्हणजे आजच्या घडीला शाळेत केवळ एक ते दीड महिन्याचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे एका विद्यार्थ्यांला केवळ पाच ते सात किलोग्रॅम तांदूळ प्राप्त होऊ शकते. यासाठी या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जिव धोक्यात घालण्याचा प्रताप शालेय शिक्षण विभाग करीत आहे का? असा प्रश्न पडला आहे.
या निर्णयाला विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर तर्फे विरोध करण्यात आला असून तसे निवेदन विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले व शिक्षण आयुक्तांना पाठविले आहे. यात शाळांमध्ये असलेल्या शापोआसाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जिव धोक्यात घालू नका असे साकडे घातले आहे. तर त्याऐवजी हा धान्यादी साठा लाॅक डाऊनच्या काळात गरीब गरजवंत लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पोलीस प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांना सुपूर्द करण्यात यावा. जेणेकरून उपाशी पोटी राहणाऱ्या लोकांची सोय करणा-या स्थानिक स्वराज्य संस्थेला मदत होईल. आपात्कालीन संकटात शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था केवळ माणूस वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. या मदतीने त्यांना ते सहज शक्य होईल. शिक्षण आयुक्तांनी शापोआचा धान्यादी साठा संपविण्यासाठी घेतलेला निर्णय तातडीने रद्द करून गरजूंना मदत करण्याचे धोरण आखण्याची मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर तर्फे शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे, विभागीय सचिव खिमेश बढिये, काॅग्रेस शिक्षक सेलचे प्रदेश महासचिव जयंत जांभूळकर, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा संघटक राजेंद्र खंडाईत, गोंदिया जिल्हा संघटक बालकृष्ण बालपांडे, श्री पंचभाई, ग्रामिण जिल्हा संघटक गणेश खोब्रागडे, शहर संघटक रविकांत गेडाम, समीर काळे, महिला जिल्हा संघटक प्रणाली रंगारी, माध्यमिक संघटक राजू हारगुडे, शेषराव खार्डे, भंडारा जिल्हा संघटक मुकुंद पारधी, नंदा भोयर, गणेश उघडे, जयंत इंगोले, अजय नहातकर, किरण भुजाडे, मनीष जुनूनकर, राजू सरोदे, उच्च माध्यमिक संघटक कमलेश सहारे, रंगराव पाटील यांनी केली आहे.