नागपूर - कोरोना विषाणूचा झपाट्याने होत असल्याने आणि सुरक्षेबाबत शासनाने आदेश दिले असल्याने सामाजिक जबाबदारी म्हणून पुढील आदेशापर्यन्त गङचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा लोक बिरादरी प्रकल्प देश आणि विदेशातील पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहील. लोकबिरादरी प्रकल्प व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.
गेली ४६ वर्ष हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प हा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आदिवासी विकासाचे काम करीत आहे. सर्वोपचार मोफत दवाखाना, ६५० विद्यार्थ्यांसाठी १ ली ते १२ वी पर्यंतची आश्रमशाळा, वन्यजीव अनाथालय व पर्यावरण संवर्धन, गाव विकास, तलाव निर्मिती व खोलीकरण, नेलगुंड्यासारख्या दुर्गम भागात शाळा अशा विविध स्तरावर अविरत कार्य करीत आहे. शासनाच्या आदेशानुसार आश्रमशाळेलासुद्धा सुट्टी देण्यात येत आहे. प्रकल्पात राहणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि दवाखान्यातील आदिवासी रुग्णांना येणाऱ्या पर्यटकांकडून कोरोना विषाणूची बाधा होऊन प्रसार होऊ नये, म्हणून प्रकल्प बंद ठेवण्यात येत आहे, अशी माहिती लोकबिरादरी प्रकल्प व्यवस्थापनाने दिली आहे.