येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवड्यापेक्षा जास्त कालावधी पासून लिलाव बंद असून शेतमाल विक्रीसाठी शेतकर्यांची मोठी अडचण झाली आहे मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतमाल जास्त भाडे देऊन विक्रीसाठी 25 ते 30 किमी अंतरावर लासलगाव किंवा विंचूर येथे घेऊन जावे लागत आहे शेतकर्यांच्या हितासाठी असलेल्या बाजार समितीने ठोस भूमिका घेऊन लिलाव सुरू करावेत अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यासह भुसार धान्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असते.येथील बाजार समितीत प्रत्येक वर्षी मार्चच्या एंड निमित्ताने शेवटच्या आठवड्यात लिलाव पूर्णतः ठप्प केले जातात मात्र आता सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने एका क्लिकवर सर्व माहिती मिळत असताना मार्केट बंद ठेवण्याची गरज काय असा सवालही या निमित्ताने उपस्थित होऊ पहात आहे इतर सर्व बाजार समित्यांचे लिलाव सुरळीत सुरू आहेत मग मार्च एंड येवला कृषी उत्पन्न बाजार समितीलाच आहे का अशा प्रतिक्रियाही शेतकर्यांमधून उमटत आहेत कोरोना सारख्या आजाराने धुमाकूळ घातल्याने सर्व बाजारपेठ ठप्प होत आहे. अशा स्थितीत शेतकर्यांना देखील काढलेले कांदे आणि शेतमाल विक्री न केल्यास त्याचे नुकसान सहन करावे लागणार आहे. ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे या शेतमालाचे नुकसानही होत आहे मात्र पिकवलेला शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठ नसल्याने अनेक शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शेजारील लासलगाव,विंचूर येथील कांदे लिलाव सुरळीत असताना येथील लिलाव मात्र बंदच असल्याने शेतकरी प्रतिनिधी देखील नाराजी व्यक्त करत आहेत. या संदर्भात बाजार समितिने व्यापार्याना लिलाव सुरु करण्याचे आवाहन केले होते.मात्र पूर्वीचा शिल्लक असलेला माल आणि मजुरांची कमतरता असल्याने लिलाव सुरू करण्यास व्यापार्यांनी असमर्थता दाखविल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता 31 मार्चला संचालक व व्यापार्यांची बैठक होऊन एक किंवा तीन एप्रिल पासून कांदा लिलाव सुरू होतील असे चित्र आहे. सध्या उन्हाळ कांदाची काढणी झाली असून बाजारभाव देखील काहीसे समाधानकारक आहे.त्यामुळे शेतकरी पहिल्या टप्प्यातील कांदा विक्रीच्या तयारीत आहेत.मात्र लिलावच सुरु नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या सगळ्या प्रकारात येवल्यातील शेतकर्यांना मात्र कांदा विक्रीसाठी लासलगाव व विंचूर येथील बाजारपेठ गाठण्याची वेळ येत आहे