नागपूर/ललित लांजेवार:
नागपुरात रविवारी सकाळी आणखी ३ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी जात असतानाच कोरोनाचा शिरकाव आता नागपुरात वाढतांना दिसत आहे. एकूण ४ रुग्ण बरे झाल्यामुळे घरी पाठवण्यात आले आहे. मात्र ते जात नाही तोच आणखी ३ रुग्ण रविवारी सकाळी भरती झाले,त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली.
लॉकडाऊनचे कटेकोरपणे पालन होत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश येत नाही. यापुढे नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले नाही, तर भविष्यात गंभीर स्थितीला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत सध्या उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीची माहिती दिली.
सध्या नागपुरात कोरोनाचे 14 रुग्ण आहेत. त्यापैकी चार रुग्ण बरे झाल्यामुळे घरी पाठवण्यात आले आहे. उर्वरीत दहा रुग्ण इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आतापर्यंत राज्यातील रुग्णांचा आकडा १९५ वर गेला आहे. तर, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.तर ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळं मुंबईत आज एका ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिच्यावर मुंबईतील महापालिका रुग्णालयात उपचार सुरू होते. या घटनेनंतर राज्यातील करोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ७ झाली आहे.
बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काल, शनिवारी मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा चाचणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं आता मृत व्यक्तीच्या संपर्कातील अन्य व्यक्तींची माहिती घेण्यात येत आहे.मृत पावलेल्या व्यक्तीला न्युमोनिया झाल्याचे निदान काल झाले होते. प्रकृती अधिक बिघडल्यानं त्या व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खबरदारीची उपाययोजना म्हणून त्याचे स्वॅब नमुने तातडीने नागपूर येथे विषाणू तपासणी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज रविवारी दुपारी आल्यानंतरच एकच खळबळ उडाली. त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं स्पष्ट झालं.