मनपा आयुक्त स्वत: उतरले रस्त्यावर
रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांना घरी जाण्याचे आवाहन
नागपूर:
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने आणि नंतर जिल्हा व मनपा प्रशासनाने ‘नागपूर लॉक डाऊन’चे आदेश काढले. त्याची अंमलबजावणी करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे स्वत: रस्त्यावर उतरले. बहुतांश सारीच दुकाने बंद असतानाही रस्त्यांवर नागरिकांना पाहून त्यांना घरी राहण्याचे आवाहन केले. जी एक-दोन दुकाने सुरू होती, त्यांना बंद ठेवण्याचे आदेश दिले.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे शनिवारी (ता. २१) सकाळी १० वाजता मनपा कार्यालयातून मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांसह बाहेर पडले. फुटाळा, सेमिनरी हिल्स, हजारी पहाड असा दौरा करीत ते बर्डीला पोहचले. व्हेरायटी चौकातील मूनलाईट सुरु दिसताच त्यांनी आपले वाहन त्या दुकानासमोर थांबविले. मूनलाईटच्या व्यवस्थापकांना ‘लॉक डाऊन’च्या आदेशाची माहिती देत तात्काळ दुकान बंद करण्यास सांगितले. मनपा आयुक्तांच्या आदेशानंतर तातडीने मूनलाईट बंद करण्यात आले.
तेथून त्यांचा ताफा महाल, बडकस चौक परिसरात पोहोचला. मनपा प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत बहुतांश दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. मात्र, जी काही दुकाने सुरू होती त्या दुकानात आयुक्त तुकाराम मुंढे आणि त्यांचा ताफा पोहोचला. त्यांना बघताच सर्व दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली आणि पुढील आदेश येईपर्यंत ती सुरू करणार नसल्याचे आश्वासन दिले.
यानंतर तेथून आयुक्तांचा ताफा थेट मोमीनपुऱ्यात पोहोचला. आयुक्त तुकाराम मुंढे हे गाडीतून उतरले आणि मोमीनपुऱ्यातील बाजारपेठेत पायी फिरले. जी-जी दुकाने सुरु दिसली त्यांना तातडीने ती बंद करण्यास सांगितले. याव्यतिरिक्त मोमीनपुऱ्यात अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी आढळून आली. त्या गर्दीलाही मार्गदर्शन करीत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या पुढील आदेशापर्यंत नागरिकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन केले.
कडक कारवाईस भाग पाडू नका : आयुक्त मुंढे
शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने आदेश काढल्यानंतरही आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आवाहन केल्यानंतरही नागरिकांना अद्यापही परिस्थितीचे गांभीर्य कळले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ही काळजी पुढील काही दिवस घ्यायची आहे. त्यामुळे कुठलेही अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी (ता. २१) दुपारी घेतलेल्या पत्रपरिषदेच्या माध्यमातून केले. विनाकारण रस्त्यावर जो दिसेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
प्रशासनाच्या आदेशाचे नागरिकांनी पालन केले नाही तर नाईलाजास्तव प्रशासनाला कडक पावले उचलावे लागतील. त्यामुळे नागरिकांनी घरी राहावे नाही तर आम्हालाच कडक पावले उचलावी लागतील, असा गर्भित इशारा देत ‘कोरोना’ संदर्भात प्रशासन किती गंभीर आहे, याबाबत सूचक विधान केले.
कोरोनाचा संसर्ग जर मोठ्या प्रमाणात झाला तर नागरिकांना भविष्यात बराच त्रास होईल. आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. कुठलेही कठोर पावले उचलण्यासाठी प्रशासनाला भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अशी वेळ नागरिकांनी येऊ देऊ नये. त्यामुळे पुन्हा पुन्हा आम्ही नागरिकांनी घराबाहेर पडू नये, कुटुंबीयांनाही बाहेर पडू नये, अशी कळकळीची विनंती करीत असल्याचे सांगितले. जे ऑटो, खासगी कार, अन्य खासगी वाहने आणि दुचाकीने शहरात फिरत आहे, त्यांनीही तात्काळ शहरातील आवागमन बंद करावे. ते जर अनावश्यक कामाने फिरत असतील तर त्यांच्यावर पोलिस कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. विनाकामाने शहरात फिरत असलेल्या नागरिकांना आता पोलिस जागोजागी विचारणा करतील. त्यांनी सांगितलेले कारण पटले नाही तर अशा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने ‘लॉक डाऊन’ आणि ‘शट डाऊन’चा आदेश नागरिकांनी घरातच राहावे, यासाठी दिला. त्यामुळे सुट्या समजून दुचाकीने शहरात फेरफटका मारण्याचे धाडसही करु नका, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.
प्रत्येक परिस्थितीचा आम्ही आढावा घेत आहोत. परिस्थितीवर आमचे नियंत्रण आहे. सर्व अधिकारी आपल्याला प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण शहर बंद करण्याची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले