Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च २५, २०२०

नागपूर शहराच्या कायदा,सुव्यवस्थेचा आणि परिस्थितीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी

जिल्हा प्रशासनाचे कार्य उत्तम सुरु असल्याने परिस्थिती नियंत्रणात: डॉ.नितीन राऊत
 नागपूर / प्रतिनिधी:
 कोरोना विषाणूच्या अनुषंगाने सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर  शहरातील कायदा-सुव्यवस्था तसेच वेगवेगळ्या भागात जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांचेसमवेत  विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित विभागाचे समन्वयक राजेंद्र करवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ.नितीन राऊत यांनी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना आपण कुठे जात आहात?  काही अत्यावश्यक काम आहे काय? अशी आस्थेने विचारपूस केली तर किराणा दुकान, भाजी बाजार, दुकानदार, फळ विक्रेते यांचेशी संवाद साधला व काही अडचणी असल्यास सांगा असे म्हटले. त्यानंतर बर्डी उड्डाण पुलाखालील गरीब-निराधार व्यक्तीला जेवणाची व्यवस्था होत आहे काय? अशी विचारपूस केली.  

संविधान चौक, इंदोर चौक, जरीपटका मार्केट, ऑटोमोटिव्ह चौक, कळमना मार्गे, पारडी, वर्धमाननगर, सेन्ट्रल एवेन्यु रोड, गांधीबाग, इतवारी, चितारओळ, मोमिनपुरा, मेयो, सीताबर्डी, छत्रपती चौक, जयताळा रोड, बजाजनगर, शंकरनगर, गोकुळपेठ फळ-भाजी मार्केट,लॉ कॉलेज इत्यादी ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिक,दुकानदार,विक्रेते यांचेशी संवाद साधला व सध्यस्थीती जाणून घेतली.

 'लॉकडाऊन'च्या काळात किराणा, दूध, भाजी,फळे, औषधी अशा सर्व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा आणि अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याच्या संदर्भात प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना डॉ.राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. माफक दरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यावर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशारा डॉ राऊत यांनी दिला आहे.

देशव्यापी लॉकडाऊनमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. जीवनावश्यक वस्तू, आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी करू नये. जिल्हा प्रशासनाचे काम उत्तम सुरू असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी शासनपातळीवर योग्य प्रकारचे नियोजन करण्यात येत असून नागरिकांनी संयम बाळगावा आणि शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ राऊत यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.