चंद्रपूर/प्रतिनिधी:
21 दिवसाच्या संचार बंदीचा आज 5 वा दिवस असून अनेकांच्या घरातील राशन संपले आहे. त्यातही काम बंद असल्याने कामागारांकडे धान्य खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नाही. अश्यात अनेकांचे राशनकार्डही नाही त्यामुळे त्यांच्या पुढे जीवन जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे ही बाब लक्षात घेता तीन महिन्याकरिता तात्काळ तात्पुरत्या स्वरूपाचे राशनकार्ड देऊन मागेल त्यांना धान्य द्या अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना केल्या आहेत.
संचारबंदी नंतर अनेक गरीब कुटुंबांसमोर उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या वतीने राशन कार्ड धारकांना राशन दुकानामधून तीन महिन्यांचे धान्य वाटप केल्या जाणार आहे. मात्र अनेक गरजू कुटुंबाजवळ राशनकार्ड नसल्याने त्यांची अडचण वाढली आहे. हे सर्व कुटुंब सध्या चिंतीत असून जेवणासाठी त्यांची धावपड सुरु आहे. यंग चांदा ब्रिगेडसह अनेक सेवा भावी संस्थाच्या माध्यमातून अन्न वाटप केल्या जात असले तरी प्रत्येक गरजू पर्यंत पोहचणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे आता सर्व गरजूंना तीन महिन्याकरिता तात्पुरत्या स्वरूपाचे राशनकार्ड उपलब्ध करून देत मागेल त्याला धान्य द्या अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहे. या कठीण काळात नागरिकांनी स्वयंम पाळण्याचे आवाहनही आ. जोरगेवार यांनी केले आहे.