चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र शासनाच्या अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्याची योजना 26 जानेवारीपासून चंद्रपूर मुख्यालयी सुरु होत आहे. गरीब, गरजू जनतेला सवलतीमध्ये भोजन मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. मिस्किन यांनी केले आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त भोजनालयातून भोजन उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण, भात समाविष्ट असलेली जेवणाची थाळी दहा रुपये प्रति थाळी याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येईल.
भोजनालय चालवण्यासाठी सद्यस्थितीत सुरु असणाऱ्या खानावळ ,एनजीओ, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टोरेंट अथवा मेस यापैकी सदर योजना राबविण्यास सक्षम असलेल्या भोजनालयाची जिल्हावार निवड करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी बस स्थानक जवळ महसूल भवन येथील मयूर स्नॅक्स कॉर्नर, गंजवार्ड भाजी मार्केट येथील विशाखा महिला बचत गट, सरकारी रुग्णालयात जवळ वैष्णवी रेस्टॉरंट अॅन्ड भोजनालय या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
भुकेल्याना वेळेचे बंधन
शिवभोजनालयाची वेळ
शिवभोजन योजनेतील भोजनालय ही दुपारी १२ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. या कालावधीत योजनेतील लाभार्थ्यांसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ही भोजनालय चालकाची असणार आहे.
या तीन संस्थांची निवड जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वातील समितीने केली आहे. राज्य शासन या योजनेसाठी प्रत्येक जेवणाच्या ताटा मागे अर्थात प्रत्येक थाळीसाठी शहरी भागामध्ये 50 तर ग्रामीण भागामध्ये 35 दर कंत्राटदारांना देणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाकडून केवळ 10 रुपये रक्कम घेतली जात असली तरी सदर थाळीची किंमत ही शहरी भागांमध्ये 50 रुपये व ग्रामीण भागामध्ये 35 रुपये असणार आहे.
दहा रुपये वगळता अन्य रक्कम ही अनुदान असणार आहे. त्यामुळे या थाळीचा वापर गरजू गरीब नागरिकांसाठी व्हावा अशी अपेक्षा आहे. चंद्रपूर मध्ये 350 थाळीचे प्रशासनाने नियोजन केले आहे.
सद्यस्थितीत प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी व महानगरपालिका क्षेत्रात किमान एक भोजनालय सुरू करण्यात येणार आहे. चंद्रपूर मध्ये ही सुविधा तीन ठिकाणी सुरु करण्यात आली आहे. जेवण दुपारी बारा ते दोन या कालावधीतच या भोजनालयातून शिव भोजन थाळी मिळणार आहे. शिव भोजन थाळी अंतर्गत प्रत्येक संस्थेला अधिकाधिक दीडशे थाळी देणे अनिवार्य आहे.
शासकीय कर्मचारी तसेच कोणत्याही आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सदर भोजनालयात सवलतीच्या दराने जेवणास सक्त मनाई असेल. प्रत्येक भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी केल्या जाणार आहे. चंद्रपूर मध्ये 26 जानेवारी पासून बस स्थानक, गंजवार्ड भाजी मार्केट व सरकारी रूग्णालया जवळ सुरू होणाऱ्या या योजनेचा लाभ गरीब व गरजू जनतेने घ्यावा ,असे आवाहन आर. आर . मिस्किन यांनी केले आहे.