अस्वच्छता दिसल्यास दंड
नागपूर:
नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकानदार, हॉकर्स, हातठेलेधारक, फेरीवाले तसेच इतर सर्व व्यावसायिकांना त्यांच्या आस्थापनेवर कचरा पेटी ठेवणे बंधनकारक राहील. तसे न केल्यास आणि आस्थापनेच्या १० वर्ग फूट परिसरात अस्वच्छता आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा फर्मान नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागने जारी केले आहे.
हे फर्मान २६ जानेवारी नंतर अंमलात येणार आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने सूचना जारी केली असून त्यात दंडाची रक्कमही नमूद केली आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या निर्देशानुसार, शहर स्वच्छतेच्या बाबतीतल्या नियमांची आता कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेतील भाग एक व अ अंतर्गत पहिल्या प्रसंगाकरिता व त्यानंतरच्या प्रत्येक प्रसंगाकरिता दंड वसूल करण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्यांकडून दंडाची मोठी रक्कम आकारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक दुकानदार, हॉकर्स, हातठेलेधारक, फेरीवाले आणि इतर सर्व व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनेत कचरा पेटी ठेवण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी प्रदीप दासरवार यांनी केले आहे.