नागपूर २२: नागपूर मेट्रोच्या रिच-३ (सिताबर्डी ते लोकमान्य नगर) एक्वा लाईनवर सीबीटीसीने ताशी ८० किमी वेगाने मेट्रोची प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी महा मेट्रो सज्ज आहे. या मार्गावर प्रवासी सेवेच्या दृष्टीने सर्व आवश्यक कार्य आणि ५ स्टेशनचे कार्य देखील महा मेट्रोने पूर्ण केले आहे. प्रवासी सेवेच्या दृष्टीने महत्वपूर्ण परीक्षण करण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) उद्या दिनांक २३ डिसेंबर रोजी नागपुर येत आहे.
सीएमआरएस या दौऱ्यात हिंगणा मार्गावर ट्रॉलीच्या साह्याने ट्रॅक अँड ओएचई व इतर आवश्यक चाचण्या पूर्ण करणार आहे. यात प्रामुख्याने कम्युनिनिकेशन बेस्ड सिग्नलिंग आणि ट्रेन कंट्रोल सिस्टमच्या (सीबीटीसी) परीक्षणाचा समावेश राहील. सीएमआरएस टीमचे नेतृत्व मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त श्री. जनक कुमार गर्ग करणार असून त्यांच्यासोबत अन्य एक अधिकारी उपस्थित असतील.
सिताबर्डी ते लोकमान्य नगर दरम्यान मेट्रोची प्रवासी सेवा सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात येथील रहिवाश्याना त्याचा फायदा होणार आहे. याशिवाय या मार्गावर असलेल्या मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल, शाळा/महाविद्यालय आणि व्यावसायिक दुकानांमध्ये येणाऱ्यांसाठी मेट्रो सेवा उपयुक्त ठरणार आहे.