.. पंचायत समिती सदस्यांचा आरोप
सावली - जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वयक्तिक लाभाच्या योजना नियमबाह्यरित्या मंजूर केल्याचा आरोप करीत बोगस लाभार्थ्यांना लाभ देण्यात येऊ नये अशी तक्रार सावली पंचायत समितीचे पदाधिकारी यांनी केली आहे.
सावली तालुक्यातील शेतकऱ्यांनी ताडपत्री, आईल इंजिन, काटेरी तार, व इतर वयक्तिक योजनेचा लाभ मिळावा याकरिता 4 महिन्यांपूर्वी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे अर्ज सादर केले. पंचायत समितीकडे आलेल्या अर्जाची छाननी करून यादी मंजुरीसाठी जिल्हापरिषदेकडे पाठविण्याचा नियम आहे त्यानुसार पंचायत समितीच्या कृषी विभागाने संवर्ग विकास अधिकारी यांच्या शिफारसीने 75 शेतकऱ्यांची यादी मंजुरीसाठी जिल्हा परिषद चंद्रपूर येथे पाठवली. अर्ज करणारे शेतकरी आपल्याला लाभ मंजूर होईल या आशेवर असतांना मात्र मंजूर यादीत मात्र जिल्हा परिषदेतील सत्ताधारी कार्यकर्त्यांचे नावं आल्याने पंचायत समिती सदस्य विजय कोरेवार यांनी चौकशी केली असता पंचायत समितीच्या कृषी विभागात मंजूर यादीतील 75 पैकी 62 शेतकऱ्यांचे अर्ज अथवा शिफारस पत्रात नाव नाही. त्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झालेला असून बोगस मंजूर यादीतील व्यक्तींना लाभ देण्यात येऊ नये व शिफारस यादीतील शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावे अशी लेखी तक्रार पंचायत समितीचे पदाधिकारी विजय कोरेवार, मनीषा जवादे, संगीता चौधरी, ऊर्मिला तरारे यांनी संवर्ग विकास अधिकारी अमोल भोसले यांचेकडे केली आहे.