नागपूर/प्रतिनिधी:
ठाण्यातील डॉ. घाणेकर नाट्यगृहात दि. २५ व २६ नोव्हेंबर रोजी महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत झालेल्या आंतर परिमंडल स्पर्धेत अव्वल ठरलेल्या नाटकांचे सादरीकरण या दोन दिवशीय स्पर्धेत होईल. स्पर्धेच्या निमित्ताने ठाणेकर रसिक प्रेक्षकांना महावितरणमधील कलावंतांच्या अभिनयाची मेजवानी मिळणार असून नाट्य प्रयोगांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. या नाट्य प्रयोगांना उपस्थित राहून कलावंतांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष तथा कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. विजयकुमार काळम पाटील (भाप्रसे) यांनी केले आहे.
महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने दरवर्षी नाट्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या पुढाकारातून या नाट्य स्पर्धा नियमितपणे होत आहेत. सोमवारी (दि. २५ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता ठाणे पश्चिममधील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक (प्रकल्प) श्री. भालचंद्र खंडाईत असतील. तर प्रमुख अतिथी म्हणून संचालक (वाणिज्य) श्री. सतीश चव्हाण, संचालक (वित्त) श्री. जयकुमार श्रीनिवासन, संचालक (मानव संसाधन) ब्रिगेडियर श्री. पवन कुमार गंजू, सहव्यवस्थापकीय संचालक श्री. विजयकुमार काळम पाटील आणि श्री. राहुल रेखावर (भाप्रसे), कार्यकारी संचालक सर्वश्री दत्ता शिंदे (भापोसे), चंद्रशेखर येरमे, प्रकाश रेशमे, अरविंद भादीकर, योगेश गडकरी, श्रीमती स्वाती व्यवहारे, प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. सुनील पावडे व श्री. दिलीप घुगल उपस्थित राहणार आहेत.
प्रादेशिक विभाग स्तरावर रसिक प्रेक्षकांची वाहवा व परीक्षकांच्या कसोट्यांवर प्रथम क्रमांक मिळविलेली नाटके या स्पर्धेत सादर होणार आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता कोकण प्रादेशिक विभागाकडून संदीप दंडवते लिखित व रेणुका भिसे दिग्दर्शित 'शापित माणसाचे गुपित' तर दुपारी साडेतीन वाजता नागपूर प्रादेशिक विभागाचे प्रशांत दळवी लिखित व अनिल बोरसे दिग्दर्शित 'ध्यानी मनी' हे नाटक सादर करण्यात येणार आहे. मंगळवारी (२६ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता पुणे प्रादेशिक विभागाकडून लेखक उदय नारकर व दिग्दर्शक पंकज तागेलपल्लेवार यांचे 'खरं सांगायचं तर' आणि दुपारी अडीच वाजता औरंगाबाद प्रादेशिक विभागाकडून गिरीश कर्नाड यांचे लेखन व श्रावण कळनुरकर यांचे दिग्दर्शन असलेले 'अग्नी आणि पाऊस' या नाटकांचे सादरीकरण होणार आहे.
मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासह नाट्य प्रयोगांना उपस्थित राहून अत्यावश्यक सेवेत राहूनही अभिनयाच्या क्षेत्रात भरारी मारू पाहणाऱ्या कलावंतांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन स्पर्धा आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे