Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर ०५, २०१९

महावितरण:मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या भेटीला पोहचले प्रादेशिक संचालक घुगल



कर्मचा-यांना मारहाण करणा-या थकबाकीदाराविरोधात कठोर कारवाईसाठी महावितरण आग्रही

नागपूर/प्रतिनिधी:

वीजबिलापोटी थकबाकीची वसुली करण्यास गेलेल्या महावितरण कर्मचा-यांना मारहाण व शिविगाळ केल्याच्या घटनांमधील दोषीविरोधात कठोर कारवाईसाठी महावितरण आग्रही असून या आरोपींविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भा.दं.सं. च्या कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी महावितरण व्यवस्थापनाने पोलीस प्रशासनाकडे केली आहे. 

दरम्यान महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी स्थानिक तुळशीबाग उपविभागाला भेट देत मारहाण झालेल्या कर्मचा-यांची आस्थेवाईकपणे विचारपुस करीत महावितरण व्यवस्थापन सदैव आपल्या कर्मचा-यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.


मागिल काही दिवसात वीजबिलापोटी असलेली थकबाकी वसुल करण्यास गेलेल्या महावितरणच्या पथकाला शिविगाळ आणि मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून सिरसपेठ, भालदारपुरा आणि अंसारनगर भागात या भागात तीन दिवसांत तीन घटना झाल्या आहेत, अश्यावेळी कर्मचा-यांनी आपले मनोबल कायम ठेवून थकबाकी वसूलीची प्रक्रीया अधिक जोमाने राबवावी, यासाठी महावितरणचे प्रशासन सदैव आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही देतांनाच दिलीप घुगल यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत थकबाकी वसुली मोहीम अधिक आक्रमकतेने राबविण्यात येणार असून यात कर्मचा-यांसोबत वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी होतील. याशिवाय थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करण्याच्या सुचनाही त्यांनी सर्व संबंधितांना केल्या.


महाल, गांधिबाग आणि सिव्हील लाईन्स या भागातील अनेक ग्राहकांनी मागिल कित्येक वर्षांपासून वीजबिलांचा भरणा केलेला नसून या तीन विभागात एकूण 118.39 कोटींची थकबाकी असून त्यापैकी 25 हजारावपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या 6 हजार 686 ग्राहकांकडे तब्बल 52.61 कोटींची थकबाकी आहे. तर 5 हजारावरील व मागिल सहा महिन्यांपासुन एकदाही भरणा न केलेल्या ग्राहकांकडे 49.32 कोटींची थकबाकी आहे. 

या ग्राहकांचा वीजपुरवठा प्राधान्यक्रमाने खंडित करण्यात येणार असून यासाठी नियोजनबद्ध मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय चुकीचे वीजबिल आल्याची तक्रार असलेल्या ग्राहकांनी नजिकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून वीजबिल योग्य करून घेण्याच्या सुचनाही दिलीप घुगल यांनी केल्या आहेत. 

यावेळी त्यांच्यासमवेत अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, कार्यकारी अभियंता समिर टेकाडे, अतिरीक्त कार्यकारी अभियंता प्रसन्ना श्रीवास्त्व उपस्थित होते. 

दरम्यान अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांनी आज (मंगळवार) रोजी पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांची भेट घेणार असून, महावितरण कर्मचा-यांना मारहाण करणा-या आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करून बोळवण केल्या जात असल्याने कर्मचा-यांचे मनोबल खच्चीकरण होत असल्याने या आरोपींविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भा.दं.सं. च्या कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करण्याच्या सुचना करण्याची विनंती केली जाईल. 

सिरसपेठ येथील घटनेत इमामवाडा पोलीसांनी चांगले सहकार्य केले मारहाण झालेल्या कर्मचा-यांना थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी नियंत्रण कक्षातील वाहन आणि पोलीस कर्मचारी उपलब्ध करून दिले मात्र, भालदारपुरा येथील घटनेत गणेशपेठ पोलीसांनी महावितरणला काहीही सहकार्य केले नाही सोबतच तक्रार दाखल करण्यासाठी ताटकळत ठेवल्याची माहिती महावितरण सुत्रांनी दिली आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.