Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर ०३, २०१९

कोराडी वीज केंद्रात “संगीत रजनी” संस्मरणीय ठरली

उत्तम गायकी व निष्णात वाद्यवृंदाने रसिक भारावले
मेडले व युगल गीतांना भरभरून दाद
नागपूर/प्रतिनिधी:
गीत-संगीताची आवड असणे हे चांगले लक्षण असून मन उत्साहित होऊन आत्मिक समाधान मिळते आणि काही काळ तणाव दूर सारण्याचे हे प्रभावी माध्यम असल्याने कोराडी वीज केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त रंगमंच, मारुती मैदान कोराडी येथे "संगीत रजनी" या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

नागपुरातील स्वरमधुरा ग्रुपचे सुप्रसिद्ध गायक राजेश दुरुगकर, इशा रानडे ,स्वस्तिका ठाकूर व संचाने अतिशय उत्तमरीत्या हिंदी-मराठी फिल्मी गीतांचा दर्जेदार कार्यक्रम सादर केला. 

राजेश दुरुगकर यांनी मुकेश,रफी,किशोर तसेच सुरेश वाडकरांच्या आवाजात हुबेहूब गीते सादर करून आपल्या आवाजाची जादू रसिकांना दाखवून दिली. 

देशातील नामवंत गायक जसे लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, रेशमा, पवनी पांडे, कनिका कपूर,मुकेश, मोहम्मद रफी, किशोर कुमार, सुरेश वाडकर,भूपेन हजारिका, राहत फतेह अली खान यांची अजरामर, रसिकांच्या हृदयात असलेली हिंदी-मराठी गाणी ज्यामध्ये प्रेम,मैत्री,विरह,भक्ती,गझल,सुफी अश्या संमिश्र गीतांची सुरेख गुंफण करण्यात आली. 

ज्यामध्ये “ईश्वर सत्य है”, “अजि रूठकर हम”, “एक प्यार का नगमा है”, “रैना बरसे रिमझिम”, “थाडे रही यो”, “नमस्कार घ्यावा अहो बुद्धदेवा”, “दिल हुम हुम करे”, “लैला मै लैला”, “होटो पे ऐसी बात”, “निगाहे मिलाने को”, “तो से नैना मिलायके”, “दमादम मस्त कलंदर” यांसारखी दमदार गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

गायकांच्या जोडीला वाद्यवृंदाने तितकीच दर्जेदार साथसंगत करून अधिकचा गोडवा निर्माण केला. यामध्ये सचिन ढोमणे(तबला), संजय बारापात्रे (कांगो-बांगो), सुभाष वानखेडे(ड्रम व ऑक्टोपॅड), पवन मानवटकर(कि बोर्ड),प्रवीण लिहितकर(गिटार), अमर शेंडे(व्हायोलीन), अरविंद उपाध्याय(बासरी) तर संगीत रजनी कार्यक्रमाचे ओघवी सूत्र संचालन एम.ए. रज्जाक यांनी अभ्यासपूर्ण शैलीत शेरो-शायरीसह तसेच रसिकांची नेमकी आवड हेरून केले. 

उदयोन्मुख गायिका स्वस्तिका ठाकूर आणि राजेश दुरुगकर यांनी "पत्ता पत्ता बुटा बुटा”, “ओ मेरे सनम”, “अज हु ना आए बालमा”, “तेरे बिना जिंदगीसे” तर इशा रानडे व राजेश दुरुगकर या जोडगोळीने “एक प्यार का नगमा है”, “पर्बत के इसपार”, “तेरे मेरे मिलनकी ये रैना”,”सावन का महिना” हि युगल गीते सादर करून रसिकांच्या टाळ्या घेतल्या. 

इशा रानडे यांच्या “दिल चीज क्या है”, स्वस्तिका ठाकूर यांच्या “लंबी जुदाई” आणि राजेश दुरुगकर यांच्या “तेरे जैसा यार कहाँ”, “जिंदगी तो बेवफा है”, “ये दोसती हम नहि छोडेंगे” या गीतांना वन्स मोअर मिळाला. 

राजेश दुरुगकर यांनी “ये शाम मस्तानी”, “दिवाना लेके आया है” , “मेरे सपनो कि रानी” या गीतांचे मेडले सादर करून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. 

याप्रसंगी सत्यम शिवम सुंदरम, आरजू, एक नजर, वो कौन थी, कटी पतंग, मेरे जीवनसाथी, आराधना, पाकिजा, उमराव जान, रुदाली, सरगम, ज्वेलथीप, याराना, मुकद्दर का सिकंदर, शोले, दिल हि तो है, अभिमान, मिलन, आंधी आणि संगम सारख्या सदाबहार सुपरहिट चित्रपटांतील गाणी सादर करण्यात आली. 

कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंते राजेश पाटील, राजकुमार तासकर, अनंत देवतारे, दिलीप धकाते, उप मुख्य अभियंता गिरीश कुमरवार, सुनील सोनपेठकर, शांताराम पौनीकर, अधीक्षक अभियंते, विभाग प्रमुख, अभियंते,कर्मचारी तसेच कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वर्धापन दिन समितीचे पदाधिकारी व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सुमारे तीन तास रसिक श्रोत्यांनी प्रत्येक गाण्याचा मनमुराद आनंद लुटला व दर्जेदार संगीत कृतीमुळे संगीत रजनी संस्मरणीय ठरली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.