मनोज चिचघरे, भंडारा/जिल्हा प्रतिनिधी
भंडारा विधानसभा क्षेत्रातून अनुसूचित जातीतील बौद्ध उमेदवाराला उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपाचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष अॅड.महेंद्र गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भंडारा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री मा.डाॅ. परिणयजी फुके व संघटन मंत्री डाॅ. उपेंद्र कोठेकर व जिल्हाअध्यक्ष इंजि. प्रदिप पडोळे यांना पत्राद्वारेे केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पवनी हे पूर्वी विधानसभा क्षेत्र होते. आता नव्याने विधानसभा क्षेत्राची पुनर्रचना करण्यात आली असून आता हे क्षेत्र भंडारा विधानसभा क्षेत्राचे नावाने ओळखले जाते.
हे क्षेत्र सन 2009पासून अनुसूचित जातीसाठी राखीव असून सन 2009 मध्ये भाजपा सेना युतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर निवडून आले होते. तर सन 2014 मध्ये भाजपा स्वतंत्र लढली होती व भाजपाचे अॅड. रामचंद्र अवसरे निवडून आले असून हे दोन्ही उमेदवार अनुसूचित जातीतील चांभार या जातीचे आहेत.
उपरोक्त दोन्ही निवडणुकीत अनुसूचित जातीतील महार बौद्ध जातीच्या उमेदवाराला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे सन 2019 मध्ये होवू घातलेल्या निवडणुकीत महार बौद्ध जातीच्या उमेदवाराला संधी देणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे म्हणजे सन 2009 पासून सन 2019 पर्यंतच्या दहा वर्षात फार मोठ्या संख्येने विविध पक्षांचे महार बौद्ध जातीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भाजपा मध्ये प्रवेश घेतला असल्यामुळे त्यांना प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे.
त्यामुळे येत्या ऑक्टोबर मध्ये होवू घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भंडारा विधानसभा क्षेत्रातून महार बौद्ध जातीच्या उमेदवाराला संधी देण्यात यावी,अशी मागणी भाजपाचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष अॅड. महेंद्र गोस्वामी यांनी केली आहे.