वर्धा/प्रतिनिधी:
हिंगणघाट शहरातील डांगरी वार्ड परिसरात राहणाऱ्या दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षा वर दारूविक्रेत्यांकडून धारधार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल रात्री ९ च्या सुमारास घडली . याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.
पूजा प्रवीण काळे (३०) असे दारूबंदी महिला मंडळाच्या जखमी अध्यक्ष महिलेचे नाव आहे.
पूजा प्रवीण काळे या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जिल्हा दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत. दारूबंदी महिला मंडळाची बैठक घेऊन त्या आपल्या डांगरी वॉर्डातील निवासस्थानाकडे येत होत्या. दरम्यान, घराजवळ चार दारूविक्रेत्यांनी त्यांना अडविले व मारहाण सुरू केली असे सांगण्यात येत आहे.पूजा काळे यांना उपचारासाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,या प्रकरणी पोलिसांनी गणेश भांगे (३२), गोलू पांडे (३४), संदीप थुटरकर ३८ सर्व रा. डांगरी वॉर्ड, हिंगणघाट यांना मंगळवारी अटक केली आहे.