मूल/ प्रतिनिधी
दारूमुळे समाज बरबाद होत आहे, ही बाब लक्षात घेऊन श्रमिक एल्गारने आंदोलन उभारून दारूबंदीची मागणी रेटून धरली होती. शासनाने त्यास मान्यता दिली. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत श्रमिक एल्गार या संघटनेला बळ देण्यासाठी मी सदैव सोबत असल्याची ग्वाही पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेवराव जानकर यांनी दिली.
श्रमिक एल्गारच्या कार्याला यंदा 20 ऑगस्ट रोजी 20 वर्ष पूर्ण होत आहेत. या पूर्वसंध्येला महादेवराव जानकर यांनी शुक्रवारी चितेगाव येथील कार्यालयाला भेट दिली.
यावेळी श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅङ. पारोमिता गोस्वामी यांनी त्यांचे स्वागत केले. पुस्तक, संघटनेच्या कार्याची माहिती पुस्तिका आणि वार्षिक अहवाल विशेषांक यावेळी त्यांना भेट देण्यात आले.
गोस्वामी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी, पशूपालक आणि मत्स्य व्यवसाय यांच्या समस्या मंत्रिमहोदयांनी पुढे मांडल्या. मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक घरांची पडझड झाली आहे. अनेक शेती पाण्याखाली आल्या. या सर्वांचे पंचनामे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तातडीने करण्यात यावेत, जंगलग्रस्त भागातील वन अतिक्रमणधारकांना जमिनीच्या पट्ट्यासाठी तीन पिढीची लावलेली जाचक अट रद्द करण्यात यावी. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि गुराखी मृत्युमुखी पडत आहे. या भागात जनावरांची संख्या मोठी असल्याने गुराखी जंगलात जात असतो. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या गुराख्यांसह मेंढपालांचा विमा काढण्यात यावा, जिल्ह्यात सर्वच गावातील राकेल पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण महिलांना पावसाळ्याच्या दिवसात गैरसोयीला सामोरे जावे लागते. त्यामुळे राकेलचा पुरवठा नियमित करण्यात यावा, आदी मागण्या मांडल्या. त्यावर पशुसंवर्धन दुग्धविकास मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी शासनाने घेतलेल्या विविध धोरणात्मक निर्णयाची माहिती दिली. शेतकऱ्यांनी मत्स्य, शेळी, गाई पालन आणि दूग्ध व्यवसाय जोडधंदा म्हणून करावा, यातून आर्थिक उन्नती होईल, असे आवाहन केले. याशिवाय जनधन योजनेतून गुराखींसाठी विमा योजना काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मत्स्य व्यवसाय सहकारी फेडरेशनचे जिल्हाअध्यक्ष पांडुरंग गेडाम यांनी मच्छिमार व्यवसायांच्या समस्यांची कैफियत मांडली.
यावेळी मूलचे तहसीलदार जाधव, पशूसंवर्धन अधिकारी चोनकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते संजय कन्नावार, मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे, श्रमिक एल्गारचे महासचिव घनश्याम मेश्राम, संगिता गेङाम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन उपाध्यक्ष विजय सिध्दावार यांनी केले.