चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्याला 200 युनिट विज मोफत देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वाक्षरी मोहिम करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत 1 लाख स्वाक्षरीपत्र मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार आहे. काल गुरुवारी खासदार बाळू धानोरकर यांनी मोहिमेच्या स्वाक्षरीपत्रावर हस्ताक्षर करून या मोहिमेत सहभाग नोंदविला. यावेळी नगरसेवक विशाल निंबाळकर, माजी नगर सेवक बलराम डोडानी, कलाकार मल्लारप, राहूल पाल यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
चंद्रपुर जिल्हा हा विज उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. याचा दुष्परिणामही चंद्रपुरातील जनता भोगत आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांना 200 युनिट विज मोफत द्या अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी केली आहे. या मागणीसाठी लोक अभियान सुरु करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत ठिकठिकाणी जनजागृती रॅली काढण्यात येत आहे. एक महिना चालणा-या मोहिमेचा आज 16 वा दिवस असून या मोहिमेत चंद्रपूरकरांचा प्रचंड सहभाग लाभत आहे.
दरम्यान काल गुरुवारी किशोर जोरगेवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे खासदार बाळू धानोरकर यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांबाबत त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांनीही यावेळी या मोहीमेतील स्वाक्षरी पत्रावर स्वाक्षरी करून या मोहिमेत आपला सहभाग नोंदविला. दिल्लीच्या धरतीवर चंद्रपूरकरांनाही 200 युनिट विज मोफत देण्यात यावी अशी चंद्रपूरकरांची भावना आहे.
आपण सूध्दा चंद्रपूरातील नागरिक असून विज केंद्रामूळे होणा-या समस्यांबाबत अवगत आहात त्यामूळे चंद्रपूरातून उठलेला विज बिल आजादीचा आवाज आपण दिल्लीपर्यत पोहचवावा अशी विनंती यावेळी किशोर जोरगेवार यांनी खासदार बाळू धानोरकर यांना केली. विषयाची गांभिर्यता लक्षात घेता बाळू धानोरकर यांनीही जोरगेवार यांच्याशी या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली