मार्गदर्शन शिबिरात ५० अभियंत्याची उपस्थिती
नागपूर/प्रतिनिधी:
विदुयत शाखेतील पदविकाधारक आणि पदवीधारक बेरोजगार अभियंत्यांना महावितरण लॉटरी पद्धतीने मोठ्या प्रमाणात कामे देणार असल्याने विदुयत शाखेतील बेरोजगार तरुणांनी महावितरणकडे आपली नावे नोंदविण्याचे आवाहन नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी केले.
काटोल रॊड येथील महावितरण कार्यालयात विदुयत शाखेतील पदविकाधारक आणि पदवीधारक बेरोजगार अभियंत्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यास जिल्ह्यातील विविध भागातून ५० युवक उपस्थित होते. विदुयत परवाना मिळवण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र, अनुभव या संदर्भात उपस्थित उमेद्वारांना नागपूर शहर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांनी माहिती दिली.
वीज विषयक कामे करताना आवश्यक असलेला विदुयत परवाना आता स्थानिक कार्यालयात मिळणार असल्याची माहिती नागपूर जिल्हा विदुयत निरीक्षक प्रदीप चामट यांनी यावेळी दिली.या अगोदर विदुयत परवाना मिळवण्यासाठी उमेदवाराने स्थानिक जिल्हा विदुयत निरीक्षक कार्यालयात अर्ज केल्यावर तो पुढील कारवाईसाठी मुंबई येथे पाठविल्या जात होता. यात बराच कालावधी जात असल्याने यात बदल करून जिल्हा विदुयत निरीक्षक यांना यासाठी आवश्यक असणारे अधिकार नुकतेच प्रदान करण्यात आल्याने हा परवाना लवकर मिळणार आहे.
विदुयत शाखेतील पदविकाधारक आणि पदवीधारक तरुण/तरुणींना महावितरणकडून १० लाख रुपया पर्यंतची कामे विना निविदा देण्याची तरतूद केली आहे. ही कामे एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास लॉटरी पद्धतीने वाटल्या जातात. पहिल्या वर्षात मिळालेली कामे सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंत्याने मुदतीत व यशस्वीपणे पूर्ण केली तर त्यांना दुसऱ्या वर्षी प्रत्येकी १५ लाखरुपयांची कामे थेट लॉटरी पध्दतीने देण्यात येतील. अशी माहिती महावितरणकडून उपस्थितांना देण्यात आली.
विदुयत शाखेतील पदविकाधारक आणि पदवीधारक बेरोजगार अभियंत्यांसाठी महावितरणने आपल्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक सुरु केली असून त्या ठिकाणी उमेदवार माहिती भरून लॉटरी पद्धतीने कामे मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. यावेळी अधीक्षक अभियंता बंडू वासनिक, कार्यकारी अभियंता अविनाश सहारे. संजय गिरी, सहायक अभियंता जयेश कांबळे उपस्थित होते.