नागपूर/प्रतिनिधी:
अपघात विरहीत वीजपुरवठ्याच्या हेतूने जिल्हा नियोजन समितीच्या सहकार्याने महावितरणने हाती घेतलेल्या विशेष मोहीमेत आतापर्यंत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या वर्दळीच्या ठिकाणावरील तब्बल 699 अपघातप्रवण स्थळांवरील धोकादायक वितरण यंत्रणा हटविण्यात अथवा भुमिगत करण्यात आली असून 131 स्थळांवरील धोकादायक यंत्रणा हटविण्याचे अथवा भुमिगत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठ्यासोबतच अपघात विरहीत वीज वितरण यंत्रणेचा निर्धार राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला होता, याबाबत स्वत: ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीत तरतूद करण्याची विनंती करणारे पत्र संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदारांना केली होती. त्याअनुषंगाने महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनीही पुढाकार घेत महावितरणच्या संचलन व सुव्यवस्थेच्या निधीतून या कामांसाठी तरतूद करुन अपघातप्रवण स्थळांवरील धोकादायक वीज वितरण यंत्रणा हटवून किंवा त्यास भुमिगत करून ही स्थळ अपघातविरहीत करण्याचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेतले.
यानुसार महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरु असून आतापर्यंत विदर्भातील वर्दळीच्या ठिकाणावरील तब्बल 699 अपघातप्रवण स्थळांवरील धोकादायक वितरण यंत्रणा हटविण्यात अथवा भुमिगत करण्यात आली आहे तर 131 स्थळांवरील धोकादायक यंत्रणा हटविण्याचे अथवा भुमिगत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यात अकोला जिल्ह्यातील 56, बुलढाणा जिल्ह्यातील 193, वाशिम जिल्ह्यातील 2, चंद्रपूर जिल्ह्यातील 84, भंडारा जिल्ह्यातील 55, गोंदीया जिल्ह्यातील 44 आणि नागपूर जिल्ह्यातील 265 अपघातप्रवण स्थळांवरील धोकादायक वीज वितरण यंत्रणा हटविण्यात किंवा भुमिगत करण्यात आली आहे. सोबतच अकोला जिल्ह्यातील 15, बुलढाणा जिल्ह्यातील 13, चंद्रपूर जिल्ह्यातील 85 तर नागपूर जिल्ह्यातील 18 स्थळांवरील धोकादायक यंत्रणा हटविण्याचे अथवा भुमिगत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
दरवर्षी वीजयंत्रणेमुळे राज्यात मोठ्याप्रमाणात प्राणांकीत आणि अप्राणांकीत अपघात होत असतात, हे अपघात टाळून राज्यातील जनतेला अखंडित व दर्जेदार वीजपुरवठ्यासोबतच अपघातविरहीत वीज मिळावी यासाठी सरकार दरबारीही विशेष प्रयत्न सुरु असून प्रगतीपथावर असलेली कामे लवकरात लवकर पुर्ण करण्यासोबतच या कामांच्या गुणवत्तेत कुठलीही तडजोड करु नये अश्या सुचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी संबंधित कंत्राटदार आणि महावितरणच्या संबंधित अधिका-यांना केल्या आहेत.