चंद्रपुर/प्रतिनिधी:
चंद्रपुरात आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ७३ व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हिरवळीवर मुनगंटीवार यांनी एका वेगळ्या कामगिरीसाठी गडचिरोलीच्या अहेरी येथील डॉ. चरणजितसिंग सलुजा यांचा सन्मान केला. 'राष्ट्रपती उत्तम जीवन रक्षा' पदक देत डॉ. सलुजा यांनी नक्षल दहशत मोडून आदिवासींसाठी केलेल्या कार्याचा यथोचित गौरव झाला.
स्वातंत्र्यदिनी निरलस सेवा करणा-या डॉ. सलुजा यांचा सन्मान म्हणजे नक्षली दहशत झुगारून मानवतेची सेवा करणा-या व्यक्तिमत्वाचा सन्मान ठरला. काहीच दिवसांपूर्वी डॉ. सलुजा यांना , 'राष्ट्रपती उत्तम जीवनरक्षा पदक' जाहीर झाले होते. हा सन्मान गडचिरोलीचे पालकत्व असलेल्या अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी गावांमध्ये विविध वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करत समाजासाठी खारीचा वाटा उचलणे हे त्यांचे कर्तृत्व. तीही स्वतःची पदरमोड करून . या जिल्ह्यात नक्षल दहशत मोडत डॉ. सलुजा आदिवासींच्या सेवेसाठी निष्ठेने कार्यरत आहेत.
३ मे २०१८ रोजी भामरागडच्या जंगलात नक्षल चकमक आणि भूसुरुंग स्फोटांदरम्यान २२ पोलीस जवान जखमी झाले होते. मार्गावर अनेक ठिकाणी भूसुरुंग पेरले असण्याची शक्यता होती. मात्र जीवाची पर्वा न करता डॉ. चरणजितसिंग सलुजा यांनी घटनास्थळ गाठत २२ जवानांचे प्राण वाचविले होते. त्यांच्या या अतुलनिय कामगिरीसाठी त्यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान केला गेला आहे.