चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या माध्यमातून इतर मागास प्रवर्गातील युवक व युवतींकरिता यंरोजगारासाठी अत्यल्प व्याजदराने कर्जपुरवठा योजना राबवली जात असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त युवांनी घ्यावा, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाची अंगीकृत वाहिनी असून या मंडळाद्वारे लघुउद्योगाकरिता इतर मागास प्रवर्गातील युवक आणि युवतींकरिता स्वयंरोजगारासाठी अत्यल्प व्याजदराने कर्जपुरवठा योजना राबवण्यात येत आहे. यामध्ये 1 लक्ष रुपयेची विना व्याज थेट योजना लघु उद्योगासाठी सुरू केली आहे. तसेच 5 लक्ष पर्यंतची 20% बीज भांडवल योजनेची सुरुवात झालेली असून या अंतर्गत 5 लाख रुपये पर्यंतचे प्रकल्पास मंजुरी देण्यात येते. कृषी व संलग्न व्यवसाय, वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तसेच पारंपारिक लघु व सेवा उद्योगासाठी या माध्यमातून कर्ज देण्यात येते. नाविन्यपूर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येणार असून मंजूर कर्ज रकमेच्या 5 टक्के लाभार्थी, 20 टक्के महामंडळ व 70 टक्के बँकेचा सहभाग आहे.
महामंडळाच्या कर्ज रकमेवर 60 टक्के व्याजदर असून बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेचा व्याज दर लागू राहील. कर्जाची परतफेड 5 वर्षात करायची आहे. बीज भांडवल योजनेअंतर्गत महामंडळाचे पर्याप्त निधी उपलब्ध आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जल नगर, चंद्रपुर या ठिकाणी तसेच 07172-262420 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.