Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै १२, २०१९

महावितरणचे वीजबिल भरणे झाले आता अधिक सुलभ

पेमेंट वॉलेटचा पर्याय उपलब्ध; ग्राहकांच्या सोयीसह अतिरिक्त उत्पन्नाची सुविधा
नागपूर/प्रतिनिधी:


वीजबिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सातत्याने नवनवीन सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आता आणखी एक पाऊल पुढे टाकत महावितरणने स्वतःचे पेमेंट वॉलेट आणले आहे. आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या १८ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला वॉलेटधारक होता येईल. यातून वीज ग्राहकांना विशेषतः ग्रामीण भागात वीजबिलाचा भरणा करणे सुलभ होण्यासह प्रती बील पावतीमागे ५ रुपये उत्पन्न मिळविण्याची संधी वॉलेटधारकास मिळेल.

वॉलेटधारक होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, जीएसटी क्रमांक, गुमास्ता प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो व रद्द केलेला धनादेश आदी आवश्यक कागदपत्रांच्या प्रती महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरील लिंकवर अपलोड करून ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. अर्जदारांच्या अर्जाची व जागेची पडताळणी संबंधित उपविभागीय कार्यालयाकडून विनाशुल्क केली जाईल. तर मुंबईस्थित मुख्य कार्यालयाकडून अर्जांना मंजुरी मिळणार आहे. त्यासाठीचा सर्व पत्रव्यवहार नोंदणीकृत ई-मेल व मोबाईल क्रमांकावर केला जाईल. अर्जदाराला स्वतःहून महावितरणच्या कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. मुख्य कार्यालयाकडून अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर सुरुवातीला किमान ५ हजार रुपयांचे वॉलेट रिचार्ज व त्यानंतर एक हजार रुपयांच्या पटीत रिचार्ज करावे लागेल. डेबिट व क्रेडिट कार्ड तसेच ऑनलाईन बँकिंगच्या आधारे वॉलेट रिचार्ज करता येईल. 

वॉलेटधारक महावितरणच्या अँपमध्ये नोंदणी करून महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेऊ शकतील. वॉलेटमध्ये बिलाचा भरणा झाल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर भरणा जमा झाल्याचा एसएमएस तत्काळ मिळणार असल्याने ग्राहकांचे जागेवर समाधान होऊ शकेल. एकाच वॉलेटचा बॅलेन्स वापरून विविध लॉगीनद्वारे वेगवेगळ्या व्यक्तींकडून वीजबिलाचा भरणा करून घेण्याची सुविधा वॉलेटमध्ये देण्यात आली असून याचा लेखाजोखा व कमिशन महिनाअखेर मुख्य वॉलेटमध्ये जमा केले जाईल. कोणतीही सज्ञान व्यक्ती/दुकानदार/छोटे-मोठे व्यापारी/बचत गट/वीज मीटर रिडींग व बिलवाटप एजन्सी वॉलेटधारक होऊ शकतात. वॉलेटधारकास प्रती एका बिलामागे ५ रुपये कमिशन मिळणार असून महिना अखेरीस ते वॉलेटमध्ये जमा करण्यात येईल. अधिकाधिक लोकांनी वॉलेटधारक होण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.