नागपूर/प्रतिनिधी:
मोटरसायकलच्या दस्तऐवजाची दुय्यम प्रत देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या आरटीओच्या दलालाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. अमरावती मार्गावरील शहर कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे आरटीओच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
विजय विश्वनाथ हुमने (वय ५०), असे अटकेतील दलालाचे नाव आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महापालिकेत कार्यरत आहे. त्याच्या मोटरसायकलीचे दस्तऐवज हरविले होते. दस्तऐवजाची दुय्यमप्रत मिळविण्यासाठी त्याने शहर आरटीओ कार्यालयात गाठले. येथील एका कर्मचाऱ्याने एक चिठ्ठी तक्रारदाराच्या हाती दिली.
त्यावर हुमने याचा मोबाइल क्रमांक होता. हुमनेच काम करेल, असेही त्यावर लिहिले होते. तक्रारदार हुमने याला भेटला. त्याने दुय्यमप्रत देण्यासाठी तक्रारदाराला तीन हजार रुपयांची लाच मागितली. लाच द्यायची नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीचे अधीक्षक श्रीकांत धिवरे अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुनील बोंडे, शिपाई रविकांत डहाट, मंगेश कळंबे, महिला पोलिस शिपाई अस्मिता मेश्राम, मंजुषा बुंधाळे, वकील शेख यांनी मंगळवारी आरटीओ कार्यालय परिसरात सापळा रचून हुमने याला अटक केली. हुमने याच्या अटकेनंतर हा कर्मचारी फरार झाल्याची माहिती आहे.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध |