Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून २२, २०१९

तेलंगणातील कालेश्वरम प्रकल्पाचा गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांना लाभ



मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे उद्घाटन
मुंबई/गडचिरोली,  दि. 21 : तेलंगणा राज्यातील विविधोपयोगी लिफ्ट पाणीपुरवठा योजनांचा समावेश असणाऱ्या कालेश्वरम प्रकल्पाचे (मेडीगट्टा बॅरेज) उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. या प्रकल्पातील चार उपसा सिंचन योजनांमुळे गडचिरोलीतील 7118 हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणार आहे. तसेच या प्रकल्पाचा भाग असलेल्या प्रस्तावित तुमडीहेट्टी बॅरेजमुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील 25 हजार हेक्टर क्षेत्रास सिंचन सुविधा मिळणार आहेत.

तेलंगणा राज्याच्या जयशंकर भुपालपल्ली जिल्ह्यातील मेडिगट्टा येथे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह तेलंगणा व आंध्र प्रदेशचे राज्यपाल ई.एस.एल. नरसिंहन आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांचीही उपस्थिती होती.

विविध पातळ्यांवरील प्रकल्पांचा समावेश असणारी ही जगातील सर्वात मोठी उपसा पाणीपुरवठा योजना मानली जात आहे. या प्रकल्पामुळे दोन राज्यांतील 45 लाख एकर क्षेत्राला वर्षातून दोन पिकांसाठी पाणीपुरवठा होणार आहे. या प्रकल्पांतर्गत असलेल्या मेडीगट्टा बॅरेजचा महाराष्ट्राला फायदा होणार असून या पाण्याचा वापर करून चार उपसा सिंचन योजना राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील पेंटीपाका (3216 हेक्टर), रंगय्यापल्ली (848 हेक्टर), टेकाडा (2000 हेक्टर) आणि रेगुंठा (2052 हेक्टर) यांचा समावेश आहे. या चारही योजनांद्वारे 74.34 दलघमी (2.63 टीएमसी) पाण्याच्या वापरातून जिल्ह्यातील 7118 हेक्टर सिंचन क्षेत्रास फायदा होणार आहे. या प्रकल्पाच्या पाण्यावर दोन्ही राज्यांमध्ये मच्छीमारी व नौकावहन करण्यात येणार आहे.

मेडिगट्टा बॅरेजच्या वरील बाजूस आष्टी जवळ तेलंगाणा शासनाकडून तुमडीहेटी बॅरेज प्रस्तावित आहे. या बॅरेजची पूर्ण संचय पातळी 148 मीटर असून महाराष्ट्र शासनाने त्यास तत्त्वत: मान्यता दर्शविली आहे. या बॅरेजमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 21 हजार 869 हेक्टर (4 उपसा सिंचन योजना) आणि गडचिरोली ‍जिल्ह्यातील 2471 हेक्टर असे एकूण 24 हजार 340 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

आंतरराज्य मंडळाच्या बैठकीत मेडीगट्टा बॅरेजची पूर्ण संचय पातळी 100 मीटर ठरविण्यात आली आहे. त्यानुसार प्रकल्पाची साठवण क्षमता 16.17‍ टीएमसी इतकी आहे. या बॅरेजवरुन उपशाद्वारे 160 टीएमसी पाणी उचलण्यात येणार आहे.‍ त्यातून 7 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्रास सिंचन मिळणार असून व ‍बिगर सिंचनासाठी 56 टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यातील 40 टीएमसी पाणी पिण्यासाठी आणि 16 टीएमसी पाणी औद्योगिक वापरासाठी होणार आहे.

या बॅरेजच्या बुडीत क्षेत्राच्या उजव्या बाजूला तेलंगणा राज्य असून डाव्या तिरावर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आहे. गडचिरोली जिल्ह्यात 45 किमीपर्यंत या प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र येते. या बुडीत क्षेत्रामुळे 4.80 हेक्टर सरकारी आणि 178.51 हेक्टर खाजगी जमीन बाधित होते. त्यापैकी 121.96 हेक्टर खाजगी जमीन तेलंगाणा राज्याने सरळ खरेदीने विकत घेतली आहे.

जमिनीचे संपादन कमी करण्यासाठी फ्लड बँकेचे बांधकाम करण्यात आले आहे. मेडीगट्टा बॅरेज ते सिंरोचा शहरापर्यंत पेंटीपाका नाला, राजन्नापल्ली नाला, जनमपल्ली नाला आणि लबांडपल्ली नाला असे प्रमुख चार नाले आहेत. पाणी फुगवट्यामुळे त्या नाल्यांत पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीवर निगराणी ठेवण्यासाठी आंतर राज्य पूरनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून यावर्षीच्या अनुभवाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. दोन्ही राज्यांच्या संयुक्त पथकांनी मेडीगट्टा बॅरेजच्या बुडीत क्षेत्राचे यावर्षी संयुक्त सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार पूर्ण संचय पातळीमध्ये बाधित होणाऱ्या जमिनीचे संपादन आणि महत्तम पूर पातळीमध्ये बाधित होणारे रस्ते, पूल यांची उंची वाढविण्यात येणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.