नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ,बिबटे,अस्वल नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात, कधी ताडोबातील वनमजुरांचे डब्बे पळविणे, कधी घमेला पळविणे, कधी जिप्सीचा पाठलाग करणे,तर कधी चित्तथरारक अशी शिकार करणे, अशा नानाविध कारणांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातले वाघ हे जगभरात चर्चेचा विषय ठरतात.
या वाघांमुळे चंद्रपूरचे नाव देखील जगाच्या नकाशावर वारंवार झळकू लागते.
तशी चंद्रपूरची ओळख अनेक कारणांनी आहे त्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पही एक आहे,अशातच शनिवारी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जुनोना लगतच्या जंगलातील "बाप" वाघ म्हणून ओळखला जाणारा वाघडोह नावाच्या वाघाने सर्वा देखत अस्वलीची शिकार केली, व रस्त्याच्या कडेला शिकारीचा आस्वाद घेत बसला ,विशेष म्हणजे या वाघाने अस्वलीचा अर्धा भाग खाऊन फस्त केला.
तर याच मार्गावरून जाणाऱ्या अनेक गावकऱ्यांनी व प्रवाश्यानी शिकार खात बसलेल्या वाघाची झलक बघितली व ती कॅमेरात कैद केली, या कैद करण्यात आलेल्या वाघाचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर फिरू लागला व मागील महिना ते दीड महिन्यापासून बेपत्ता असलेल्या वागडोह वाघाचा जुनोना लोहारा मार्गावर पत्ता लागला.
या वाघाचे वय १६ वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. वागडोह वाघ हा ताडोबातील बाप वाघ म्हणून ओळखला जातो.
वाघाने अस्वलीची शिकार करणे ही बाब दुर्मिळच बघितली जाते,शिकार झाल्यानंतर याच मार्गाने जाणार्या लोकांना वाघाची झलक देखील बघायला मिळाली,या वाघाने शिकार झाल्यानंतर रस्त्याच्या पलीकडे ऐटीत संचार केला,सध्या या परिसरात वाघ आढळल्याने वनविभाग त्यावर चांगलीच निगराणी ठेवून आहेत.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध |