अग्निशमन दलाकडून सुटका
दत्ताञय फडतरे (पुणे) -
काल(शनिवार) रात्री साडे अकराच्या सुमारास महमंदवाडी, दोराबजी मॉलजवळ एक कुत्र्याचे पिलू व एक इसम विहिरीत पडले असल्याची वर्दि अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास मिळाली. वर्दिवर लगेचच कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्राचे जवान ही रवाना झाले.
परंतू तिथे जवान पोहोचताच त्यांना स्थानिकांनी सांगितले की, एक कुत्र्याचे पिलू येथे पन्नास फुट खोल असणाऱ्या विहिरीत पडले असून त्याला वाचविण्याकरिता येथील एक इसम जाहेर चौधरी(वय ३४) त्या पिल्लासाठी खाली विहिरीत उतरले आहेत. त्यांच्या डोक्याला दगड विटा पडून मार लागला आहे. घटनाक्रम लक्षात घेऊन जवानांनी तातडीने रश्शीला एक बादली बांधून व एक हेल्मेट जाहेर यांना डोक्यात घालण्याकरिता पाठविले. कुत्र्याच्या पिलास जाहेर यांच्या मदतीने बादलीतून सुखरुप वर घेतले व त्याचवेळी सदर इसम जाहेर यांनादेखील रश्शीच्या साह्यानेच सुखरुप वर घेऊन उपचाराकरिता दवाखान्यात रवाना केले. कुत्र्याचे पिलू व जाहेर यांची सुखरुप सुटका अग्निशमन दलाच्या जवानांनी केली. जाहेर यांची मुक्या प्राण्याविषयी तळमळ व त्यांनी केलेले धाडस मोठेच आहे असे स्थानिकांनी सांगितले.
या कामगिरीमधे कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्राचे तांडेल कैलास शिंदे, वाहनचालक रविंद्र हिवरकर व जवान रफिक शेख, शंकर नाईकनवरे, किशोर मोहिते, ओंकार ताटे, राहूल जाधव, पंकज ओव्हाळ यांनी सहभाग घेतला.