- मुथ्थुकृष्णन संकरनारायणन्
- नवनियुक्त नगरपरिषद तसेच नगरपंचायत मुख्याधिकारी यांची कार्यशाळा
नागपूर दि. 14: नगरपरिषद, नगरपंचायतींचे कामकाज तसेच संपूर्ण यंत्रणेवर देखरेख व नियंत्रण ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असून नगरपरिषद, नगरपंचायती सुशासनाचा मुख्य आधार आहेत, असे प्रतिपादन नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक मुथ्थुकृष्णन संकरनारायणन् यांनी केले.
नवनियुक्त नगरपरिषद तसेच नगरपंचायत मुख्याधिकारी यांची नगरपरिषद प्रशासनाशी संबंधित तसेच राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाबाबत एकदिवसीय कार्यशाळा आज वनामती येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी स्थानिक निधी लेखा विभागाच्या सहसंचालक श्रीमती मोना ठाकुर, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक सतीश कुलकर्णी, द. गा. मोरे, प्रादेशिक उपसंचालक सुधीर शंभरकर, सहाय्यक संचालक कैलास झंवर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुथ्थुकृष्णन संकरनारायणन् म्हणाले, नगरपरिषद, नगरपंचायती अधिनियम 1965मध्ये वेळोवेळी होणारी सुधारणा, सभा कामकाज, नगरपरिषदेतील आर्थिक अनियमितता टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. नगरपरिषद, नगरपंचायती या लोकशाही सुदृढ करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. यासाठी लोकहित लक्षात घेऊन लोकशाहीला पोषक निर्णय घेण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्यात. केंद्र व राज्य शासन अनुदानित विविध योजनांची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
यावेळी नगरपरिषद अधिनियमातील महत्त्वाच्या सुधारणा तसेच नगरपरिषद सभा कामकाजाबाबत बल्लारपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विपिन मुदधा यांनी मार्गदर्शन केले. नगरपरिषद अर्थसंकल्प व लेखाविषयक कामकाज याविषयी सतीश कुलकर्णी यांनी तर स्थानिक निधी लेखापरीक्षण अधिनियम व नगरपरिषदांचे लेखापरीक्षण याबाबत श्रीमती मोना ठाकुर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेला औरंगाबाद विभागातील नांदेड आणि हिंगोली तसेच नागपूर आणि अमरावती विभागातील नवनियुक्त नगरपरिषद, नगरपंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रादेशिक उपसंचालक सुधीर शंभरकर यांनी तर आभार सहाय्यक संचालक कैलास झंवर यांनी मानले.