आतापर्यंत 8514 तक्रारींचे निवारण
चंद्रपूर, दि.14 मे - चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने लोकांच्या वाढत्या समस्यांचा विचार करता हॅलो चांदा या हेल्पलाईनची सुरूवात केली आहे. जेणे करून नागरीकांना आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी 155 398 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपल्या समस्यांचे निवारण करता येईल. या हेल्पलाईनमुळे 14 मे पर्यंत 8 हजार 500 चे वर तक्रारींचे निवारण झाले आहे.
या हेल्पलाईनवर अनेक तक्रारदारांचे निवारण होत असल्याने जनतेला फार मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे हॅलो चांदा या हेल्पलाईनला नागरिकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना ऑनलाइन तक्रार करण्यासाठी 155-398 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सेवेद्वारे जातीचा दाखला,उत्पन्न प्रमाणपत्र मिळण्यातील दिरंगाई, 7/12, 8अ, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसान भरपाई, पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास केलेली टाळाटाळ, शाळा अंगणवाडीतील मध्यान्ह भोजन, शेतीविषयक समस्या, अवैध दारूची विक्री, आरोग्यासंबंधित समस्या, वीज, रस्ते अशा विविध समस्यांची तक्रार सुजाण नागरिकांनी केली आहे.
यावर नागरिक आपली तक्रार सादर करून त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येते. याचे वैशिष्टये म्हणजे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या तक्रारीचे निवारण जिल्हाधिकारी यांच्याद्वारे करण्यात येते. आतापर्यंत या हेल्पलाईनला एकून 9354 तक्रारी आल्या असून त्यातील 8514 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. त्यामधील810 तक्रारी सोडविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या तक्रारीमध्ये एकूण 68 प्रशासकीय कार्यालयांचा सहभाग आहे. तसेच अधिकाधिक जनतेने प्रशासनासंदर्भात आपली काही तक्रार असल्यास हॅलो चांदा 155 398 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.