· 5 हजार 246 मतपत्रिका प्राप्त
· इतर जिल्ह्यातील 6 हजार 130 अर्ज संबंधित जिल्ह्यांना रवाना
नागपूर दि. 9 : लोकसभेच्या सार्वत्रिक रामटेक व नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करुन 14 हजार 533 पात्र अर्जदारांना पोस्टाद्वारे टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. टपाली मतपत्रिकासंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात आली आहे. टपाली मतासाठी पात्र असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मतपत्रिका पाठविण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकेकरिता एकूण 24 हजार 251 अर्ज प्राप्त झाले होते. या संपूर्ण अर्जांची छाननी केली असता त्यापैकी 3 हजार 579 अर्ज रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये अर्जामधील अर्जदारांच्या नामाचा समावेश, यादीचा भाग क्रमांक, अनुक्रमांक योग्यरित्या न भरणे, नियुक्ती आदेशाची प्रत न जोडणे आणि विहित कालमर्यादेत म्हणजेच दिनांक 8 एप्रिल 2019 नंतर अर्ज सादर करणे या कारणास्तव अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 6 हजार 139 अर्ज इतर जिल्ह्यातील असल्यामुळे हे अर्ज संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील पात्र 14 हजार 533 अर्जदारांना टपाली मतपत्रिका (पोस्टल बॅलेट पेपर) पोस्टामार्फत पाठविले आहे. त्यापैकी 5 हजार 246 टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. टपाली मतपत्रिकेसंदर्भातील संपूण प्रक्रिया पारदर्शक असून पोस्टामार्फत पात्र अर्जदारांना टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत.
रामटेक लोकसभा मतदार संघात टपाली मतपत्रिकेसाठी 13 हजार 731 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 2 हजार 71 अर्ज रद्द ठरविण्यात आले होते. 6 हजार 458 अर्ज टपालाद्वारे तर इतर मतदार संघातील 5 हजाहर 202 अर्जदार संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच नागपूर लोकसभा मतदार संघातील कर्मचाऱ्यांकडून 10 हजार 520 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 1 हजार 500 अर्ज रद्द करण्यात आले. 8 हजार 75 अर्जदारांना टपालाद्वारे मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. इतर मतदार संघातील 937 अर्जदारांचे अर्ज संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत.