अध्ययन अध्यापन प्रणाली बदलून विद्यार्थ्यांचा दर्जा उंचावा:विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार
नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर महानगरपालिकेच्या शाळांसह सहा जिल्ह्यांतील शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे ‘असर’तर्फे सर्व्हे करण्यात आले. यामध्ये मनपा शाळांतील विद्यार्थी भाषा, गणित विषयामध्ये कमकुवत असल्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक सत्रात प्रत्येक मुख्याध्यापक शिक्षकांनी अध्ययन, अध्यापन प्रणाली बदलून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने कार्य करा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेच्या समग्र शिक्षा विभागाच्या वतीने शनिवारी (ता. ४) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात अध्ययन निष्पत्ती व मुलभूत क्षमता विकास कार्यक्रमांतर्गत मनपा शाळांमधील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांची अध्ययन स्तर निश्चीती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार बोलत होते. मंचावर मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, तहसीलदार श्री. वाघमारे, मनपा शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, डीआयसीपीटीचे प्राचार्य रवींद्र रमतकर उपस्थित होते.
पुढे बोलताना विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार म्हणाले, ‘असर’द्वारे मनपाच्या शाळांसह नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांमधील शाळांच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे सर्व्हे करण्यात आले. या अंतर्गत ‘असर’चे टूल वापरून विविध स्तरावर विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये पारशिवणी तालुक्यातील शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या ४९ टक्के मुलांनाच वाचता येत असल्याचे लक्षात आले. यानंतर येथील शिक्षक व मुख्याध्यापकांनी वेळोवेळी चर्चा करून, अध्ययन व अध्यापन प्रणालीमध्ये विविध प्रयोग करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी कार्य केले. त्याचे फळ म्हणून अवघ्या तीन महिन्यातच येथील ७३ टक्के मुलांना वाचता येत असल्याचे पुढील सर्व्हेमध्ये दिसून आले. मनपा शाळांमध्ये हे प्रमाण ४३ टक्केच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक सत्रामध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी विशेष प्रयत्न करून किमान ८६ टक्क्यांवर हे प्रमाण नेण्याचे आवाहनही यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी केले.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दर्शवित येत्या शैक्षणिक सत्रामध्ये मनपा शाळांमध्ये वेगळे परिवर्तन दिसून येईल असा विश्वास दिला. यासाठी मनपाच्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांनी एकजूटीने काम करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावून मनपा शाळा १०० टक्के प्रगत करण्यासाठी कार्य करण्यात येईल, असेही यावेळी सांगितले.
यावेळी समग्र शिक्षा विभागाचे सहायक कार्यक्रम अधिकारी धनलाल चौलीवार, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांच्यासह एक हजाराच्या वर मनपा शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी नरेश सवाईतूल यांनी केले तर आभार सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके यांनी मानले.