मनपा आयुक्तांचे आदेश : नदी स्वच्छता अभियानाचा घेतला आढावा
नागपूर : नागपुरातील मुख्य तीन नद्यांसह अंतर्गत नाले आणि पावसाळी नाल्यांच्या स्वच्छता अभियानाने वेग धरला आहे. शहरातील नदी-नाल्यांच्या स्वच्छतेसह शहर सीमेबाहेरील सुमारे पाच कि.मी. लांबीच्या नदींचीही स्वच्छता करा. त्यासाठी अतिरिक्त पोकलेन व मनुष्यबळ उपलब्ध करून द्या, असे निर्देश मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.
नागपूर शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी स्वच्छता अभियाला ५ मे पासून सुरुवात झाली. अभियानांतर्गत झालेल्या नदी स्वच्छतेची प्रगती जाणून घेण्यासाठी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी (ता. १०) आढावा बैठकीत घेतली. सदर बैठकीत त्यांनी शहराबाहेरील नदी स्वच्छतेचे निर्देश दिलेत. बैठकीला अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख,अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) सुनील कांबळे,कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा, सतीश नेरळ, अमीन अख्तर, राजेंद्र राहाटे, सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर मेट्रो तसेच नदी स्वच्छता अभियानाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरात सुरू असलेल्या नदी स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या नाग नदी, पिवळी नदी, पोरा नदीअंतर्गत दहाही स्ट्रेचमध्ये स्वच्छतेचे कार्य सुरू झाले आहे. दहाही स्ट्रेचमध्ये पोकलेन लागले असून आवश्यकता भासल्यास मनुष्यबळाच्या माध्यमातूनही सफाई सुरू आहे. पिवळी नदीचा बराचसा भाग स्वच्छ करण्याची जबाबदारी नागपूर सुधार प्रन्यासने उचलली असून त्या कामालाही सुरुवात झाली आहे.
अंतर्गत नाल्यांची आणि पावसाळी नाल्यांची स्वच्छताही सुरु झाली आहे. मनुष्यबळ आणि मशीनच्या माध्यमातून ही सफाई सुरू आहे. मागील वर्षी वर्धा मार्गावर साचलेल्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले होते. यावर्षी तशी पुनरावृत्ती टाळण्यासाठी मेट्रो मार्गाच्या लगतच्या नाल्या मेट्रोने युद्धपातळीवर स्वच्छ कराव्यात, असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. याव्यतिरक्त अंतर्गत रिंग रोड लगत असलेल्या नाल्यांची स्वच्छता सार्वजनिक बांधकाम विभागाने करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नदी स्वच्छता अभियानांतर्गत ज्या-ज्या अधिकाऱ्यांची जी जबाबदारी आहे, ती त्यांनी चोखपणे पार पाडावी.दररोज अहवाल सादर करावा, असे निर्देशही मनपा आयुक्तांनी दिले.
नागरिकांच्या सहभागाचे आवाहन
नागपूर शहरातील नदी स्वच्छता अभियान हे लोकअभियान आहे. नाग नदीसह अन्य नद्या स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी नद्यांमध्ये कचरा टाकू नये, स्वच्छता अभियानात आपआपल्या परीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.