ललित लांजेवार/चंद्रपूर:
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघिणीची शिकार करणाऱ्या तीन शिकाऱ्यांना पकडण्यासाठी वनविभागाला अखेर यश आले आहे.
चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरिक्षेत्रात कोर झोनमध्ये मागील 5 दिवसांपूर्वी वाघिण मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.
या प्रकरणात तपास टीमने तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये खातोडा येथील एका वनमजुराचाही समावेश असल्याची माहिती आहे. या तिनही आरोपींना न्यायालयाने २० एप्रिलपर्यंत वन कोठडीत रवानगी केली आहे.
वाघाच्या शिकारीच्या या घटनेनंतर वन विभाग हादरून गेले होते.या घटनेनंतर आरोपीच्या शोध सुरू असताना सोमवारी शिकाऱ्यांचा सुगावा लागला. तो शिकारी खातोडा तपासणी नाक्यावर काम करणारा वनमजुरच निघाला. अमोल आत्राम (२३) रा. खुटवंडा असे त्याचे नाव आहे. त्याची कसून चौकशी केली असता तो शिकाऱ्यांचा खबरी असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत त्याने सुरेश कन्नाके उर्फ कुमरे (२९) रा. पळसगाव (शिंंगरू) तसेच रमेश मसराम (४१) रा. पळसगाव (शिंंगरू) या दोघांची मुख्य शिकारी म्हणून नावे उघड झाली.
सदर तीनही आरोपींना वन विभागाने अटक करून वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार वन्यजीवांची अवैध शिकार करणे, वन्यजीवांच्या अधिवासाला धोका पोहचविणे, जंगलात विना परवाना शस्त्रासह प्रवेश करणे आदी कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना भद्रावतीच्या न्यायालयात हजर करण्यात आले.