Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल ०८, २०१९

हिमसागर एक्सप्रेसचे नागपुरात जल्लोषात स्वागत

रेल्वेच्या माध्यमातून देशभरात मतदार जनजागृती
 निवडणूक आयोगाचा अभिनव उपक्रम
नागपूर/प्रतिनिधी:

 एकीकडे देशभरात निवडणूक फीव्हर चढला असताना या निवडणुकीत १०० टक्के मतदान व्हावे यासाठी निवडणूक आयोग विविध उपक्रम राबवित आहेत. रेल्वेच्या सहयोगाने देशभरात लांब पल्ल्याच्या गाड्यांवरून जनजागृती करण्यात येत असून या गाड्यांचे देशभरातील स्थानकावर जल्लोषात स्वागत होत आहे. देशातील सर्वात जास्त अंतर धावणाऱ्या हिमसागर एक्सप्रेसचे आज (ता. ७) पहाटे नागपूर स्थानकावर स्वागत करीत प्रवाशांना मतदानाचे आवाहन करण्यात आले.

‘कोई मतदाता ना छुटे’, ‘ वोट करने अवश्य जाएँ’, असे आवाहन करणारे पोस्टर्स रविवारी पहाटे नागपुरात दाखल झालेल्या हिमसागर एक्स्प्रेसवर पाहून फलाटावर उपस्थित प्रवाशांनी रेल्वेगाडीसोबतच सेल्फी काढले. निवडणूक आयोग आणि भारतीय रेल्वेच्या या उपक्रमाचे कौतुक करीत ‘आपण मतदान करणारच’ अशी शपथ प्रवाशांनी घेतली.

या गाडीच्या संपूर्ण कोचवर मतदार जनजागृतीचे संदेश लावण्यात आले आहेत. निवडणूकसंबंधी कुठलीही माहिती जाणून घेण्यासाठी असलेला टोल फ्री क्रमांक १९५०, निवडणूक जनजागृतीसाठी देशाचे ऑयकॉन असलेले अभिनेता आमीर खान, क्रिकेट खेळाडू राहुल द्रविड, दिव्यांका त्रिपाठी यांचे मतदान करण्याविषयीचे संदेश यासह विविध माहिती देण्यात आली आहे.

कन्याकुमारीवरून निघालेल्या या गाडीचे नागपूर येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नागपूर रेल्वे स्थानकावर ही गाडी रविवारी (ता. ७) पहाटे २.५० वाजता पोहचली. निवडणूक नोडल अधिकारी (नागपूर शहर) डॉ. रंजना लाडे, नागपूर रेल्वे उपस्थानक प्रमुख (व्यावसायिक) ए.एम. श्रीवास्तव, उपस्थानक प्रमुख राकेश कुमार यांनी हिमसागर एक्स्प्रेसचे स्वागत केले. महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वतीने मतदान करण्याचा संदेश असलेले बॅनर्स आणि सेल्फी प्वॉईंट फलाटावर उभारण्यात आले होता. प्रवाशांनी सेल्फी प्वाईंटसमोर आणि जनजागृतीचे फलक असलेल्या रेल्वेसमोर सेल्फी काढून सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत संदेश पोहचविण्याचा विश्वास यावेळी दिला. प्रवाशांनी येणाऱ्या निवडणुकीत मतदान करावे आणि मतदानाचा संदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन नोडल अधिकारी डॉ. रंजना लाडे यांनी यावेळी केले.

पहाटे ३ वाजता नोडल अधिकारी डॉ. रंजना लाडे यांनी हिरवी झेंडी दाखवून जनजागृतीच्या पुढील प्रवासाकरिता रेल्वेला रवाना केले. यावेळी मनपा शिक्षण विभागाचे विनय बगले, कपिलनगर हिंदी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पुसेकर, जि.प.चे विस्तार अधिकारी प्रभाकर वाघ, शेषराव राऊत, विलास लोखंडे, जि.‌प.चे सहायक प्रशासन अधिकारी महेश राऊत, आनंद आंबेकर, श्रीमती उज्ज्वला भोयर उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.