महाराष्ट्रातील उद्योजकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास महावितरण कटीबध्द: संजीव कुमार
नागपूर/प्रतिनिधी:
व्हिडीओ कॉन्फरेन्सच्या थेट संवादात यावेळी संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू, संचालक (वाणिज्य) श्री. सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प) श्री. भालचंद्र खंडाईत व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी पुणे व कोंकण प्रादेशिक विभागातील औद्योगिक ग्राहकांसोबत आज प्रकाशगड मुख्यालयातून व्हिडीओ कॉन्फरेन्सद्वारे थेट संवाद साधला. औद्योगिक ग्राहक संघटना व त्यांचे प्रतिनिधी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुणे आणि कोंकण प्रादेशिक विभागामधील ठाणे, वाशी, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, अहमदनगर, सांगली, जळगाव, रत्नागिरी, उल्हासनगर, डोंबिवली, शहापूर, मुरबाड, महाड, वसई, मालेगाव, कुपवाड, मिरज इत्यादी औद्योगिक ग्राहक प्रतिनिधींनी या संवादात सहभाग नोंदविला. त्यांनी प्रामुख्याने मोबाईल व्हॅन, मीटर्स, फिडर सेपरेशन करणे, पायाभूत सुविधांची उभारणी इत्यादी विषयांबाबत चर्चा करून महावितरणच्या सेवेत आणखी सुधारणा करण्यासाठी त्यांनी सुचना केल्या. तसेच एमआयडीसी, महापारेषण कंपनीच्या अखत्यारितील मागण्यांबाबत विशेष प्रस्ताव सादर करणे, त्यांच्यासोबत समन्वय बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत सुचविण्यात आले.
औद्योगिक ग्राहकांना नेहमीच उत्कृष्ट सेवा देण्यावर महावितरणचा भर असून त्यात आणखी सुधारणा करण्यात येणार असल्याचे या संवादात सांगण्यात आले. औद्योगिक ग्राहकांसाठी राज्यभरात मीटरचा पुरवठा मुबलक करण्यात आला असून नवीन औद्योगिक ग्राहकांनी वीजजोडणीचा अर्ज ऑनलाईनच करावा, असेही आवाहन श्री. संजीव कुमार यांनी यावेळी केले. देखभाल दुरुस्तीच्या कामाचे योग्य ते नियोजन करून या कामासाठी औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा महिन्यातून एकदाच बंद करण्यात येईल, याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याबाबत क्षेत्रिय कार्यालयांना त्यांनी सूचित केले व या कामासाठी स्वतंत्र कर्मचारीवर्गही नेमण्याचे सांगितले.
औद्योगिक ग्राहकांच्या समस्या समजावून घेऊन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी त्यावर त्वरित उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना सर्वसंबंधिताना व्हिडीओ कॉन्फरेन्सद्वारे दिल्या. औद्योगिक ग्राहक संघटनेच्या प्रतिनिधींनी महावितरणने सुरू केलेल्या औद्योगिक ग्राहकांसोबत व्हिडीओ कॉन्फरेन्सद्वारे थेट संवाद या अभिनव उपक्रमाचे उत्स्पूर्त स्वागत करून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांचे आभार मानले.